व्हॅलेंटाईन डेसाठी दीड कोटी गुलाबांची निर्यात
पुणे – व्हॅलेंटाईन डे करिता मावळ तालुक्यातून यावर्षी तब्बल दीड कोटी फुले जागतिक बाजारपेठेत पाठविण्यात आली आहे. २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही फुले निर्यात करण्यात आली. यावर्षीचा हंगाम हा फुलांच्या वाढीकरिता पोषक राहिल्याने फुलांचे उत्पादन चांगले झाले आहे. सोबत परदेशी व स्थानिक बाजारपेठेत फुलांना भावही चांगला मिळाल्याने मावळातील फूल उत्पादक शेतकरी सुखावला आहे. टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे.
मावळ तालुक्यात १२०० एकर क्षेत्रावर पॉलीहाऊसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेतले जाते, अशी माहिती पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे व पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी सांगितले.
भेगडे म्हणाले, मावळ तालुक्यातील वातावरण हे फुलांच्या वाढीसाठी पोषक असल्याने भारतातील जवळपास ७० टक्के फुलांचे उत्पादन हे मावळ तालुक्यात घेतले जाते. ठाकर म्हणाले, मावळ तालुक्यातील वातावरण यावर्षी गुलाब फुलांकरिता पोषक राहिल्याने मोठय़ा प्रमाणात फुलांचे उत्पादन झाले, तसेच रोगांचा प्रभावही कमी राहिला. विदेशी बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेत फुलांना चांगली मागणी राहिल्याने विदेशी बाजारपेठेत सरासरी १३ ते १५ रुपये, तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ८ ते १० रुपये फुलांना यावेळी भाव मिळाला आहे.
फुलांच्या निर्यातीमधून मोठय़ा प्रमाणात परकीय चलन शासनाला मिळत असल्याने शासनाने फूल उत्पादक शेतक-यांचे प्रश्न प्राधान्य क्रमाने सोडवावेत. शेतक-यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेसह विदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळाल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते, असे फूल उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांनी सांगितले. गुलाब फुलांना १४ फेब्रुवारी रोजी जगभरात मागणी असली तरी फुलांचे उत्पादन हे वर्षभर सुरू असल्याचे मुकुंद ठाकर यांनी सांगितले.