राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार मिळवलेले आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांची दोन पुस्तके अलीकडेच प्रकाशित झाली आहेत. त्यातील ‘प्रेरणा’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ‘कुस्तीगीर’ हे कुस्तीचे मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. कुस्तीवर आधारित ही दोन पुस्तके प्रत्येक कुस्तीप्रेमींनी आवर्जून वाचावीत आणि संग्रही ठेवावीत, अशी आहेत.
सांगली जिल्हय़ातील मिरज तालुक्यातील कवलापूर या गावातील उत्तमराव यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून मार्ग काढत कुस्तीच्या जोरावर मिळवलेले अफाट यश हे त्यांच्या ‘प्रेरणा’ या आत्मचरित्राचे वैशिष्टय़ आहे. ‘कुस्तीसाठी काही पण’ हीच कोवळ्या वयापासून बाळगलेली जिद्द उत्तमराव यांनी आता वयाच्या ६५व्या वर्षीही कायम ठेवली आहे, ही बाब पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. त्याप्रमाणेच महत्त्वाचे म्हणजे कुस्ती खेळताना शिक्षणाचीही जोड हवी हे त्यांनी सुरुवातीपासून जाणले आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करताना त्यांनी त्यांच्याकडे कुस्ती खेळायला येणा-या प्रत्येकाला ते ठसवून सांगितले आहे. कारण कुस्तीत तुम्ही कितीही पारंगत असलात आणि जोडीला शिक्षण नसेल तर त्याला अर्थ नाही, हे त्यांनी पुस्तकात उदाहरणांसह सांगितले आहे.
एका कुस्तीगीराला खुराक गरजेचा असतो. मात्र लहानपणी घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे जेवण पूर्ण मिळत नव्हते. या स्थितीत पाणी पिऊन भूक मारावी लागल्याची उत्तमरावांनी मांडलेली व्यथा मनाला चटका लावून जाते. मात्र या सर्व अडचणींवर मात करत आणि जोडीला अभ्यासातही रस घेत उत्तमरावांनी सेनादलात केलेला प्रवेश त्यांची जिद्द दाखवून देतो. सेनादलातही कुस्तीच्या जोरावर त्यांनी विविध पदांवर कशी मजल गाठली हा प्रवास वाचण्यासारखा आहे. आर्मीतील सेवा संपल्यानंतर उत्तमरावांनी एक प्रशिक्षक म्हणून राज्यात नामवंत कुस्तीपटू घडवण्यासाठी दिलेले योगदान, कुस्ती प्रशिक्षक म्हणून परदेशात झालेल्या जागतिक स्पर्धामध्ये भारतीय संघाची सांभाळलेली यशस्वी जबाबदारी पुस्तकाची रंगत वाढवते. त्यात महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले शासकीय कुस्ती केंद्र चालवण्याचे आव्हानही त्यांनी सहज स्वीकारले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील प्रसिद्ध शासकीय कुस्ती केंद्राची नव्याने आलेली जबाबदारी उत्तमरावांनी कशी हाताळली हे वर्णनही पुस्तकाची रंगत वाढवते. कुस्तीचे माहेरघर म्हटल्या जाणा-या कोल्हापुरात विविध नामांकित तालमी असताना कसबा बावडाचे महत्त्व कसे वाढले हे वाचायला मिळते. दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी संजय पाटील आदी नामवंत पहेलवान उत्तमरावांच्या मार्गदर्शनाखाली घडले. ही मोठी जबाबदारी पार पडताना उत्तमरावांची त्यांच्या घरच्या जिल्हय़ात म्हणजे सांगली येथे वसंतदादा कुस्ती केंद्रात कुस्ती प्रशिक्षक म्हणून बदली झाली. त्या वेळी त्यांनी मुन्नालाल शेखसारखे नामवंत पहेलवान तयार केले. तेथूनही सेवानिवृत्त झाल्यावर उत्तमरावांना कुस्ती प्रशिक्षक होण्याची आणखी एक संधी ‘वसंतदादा कुस्ती अॅकॅडमी, साखर कारखान्या’ने दिली. आता या केंद्रातूनही त्यांनी राष्ट्रीय कुस्तीगीर घडू लागले आहेत. उत्तमराव फक्त तेवढय़ावरच थांबले नाहीत तर त्यांनी जोडीला त्यांच्या कवलापूर गावात ‘उशांत व्यायामशाळा’ सुरू केली. या व्यायामशाळेद्वारे फक्त कुस्तीच नाही तर स्पर्धा परीक्षांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात, हे सर्व पुस्तकातून वाचायला मिळते.
याबरोबर उत्तमरावांनी त्यांचा स्वकष्टातून उभारलेला बंगला, आई-वडील, पत्नी आणि मुलांबाबत दिलेली कौटुंबिक माहितीही वाचायला मिळते. हे पुस्तक त्यांनी त्यांचे गुरू दिनकरराव सूर्यवंशी यांना समर्पित करून शिष्य म्हणून त्यांना असलेली जाणीव दाखवून दिली. कुस्ती पंच म्हणूनदेखील राज्यातील विविध नामांकित स्पर्धामध्ये त्यांनी उमटवलेला ठसा वाचनात येतो. कुस्ती पंच म्हणून काम करताना अचूक निर्णयक्षमतेला किती महत्त्व आहे, हे त्यांच्या लेखातून वाचायला मिळते. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे उत्तमरावांनी त्यांना त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पावलावर सहकार्य देणा-यांचे आभार त्यांच्या नावांसह मानले आहेत. एकंदरीत प्रत्येक कुस्तीप्रेमीने हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.
प्रेरणा (आत्मचरित्र)
पानं : १६४
किंमत : १०० रुपये
कुस्तीवर लिहिलेल्या विविध पुस्तकांमध्ये उत्तमराव पाटील यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक म्हणजे ‘कुस्तीगीर’. विशेषत: ज्यांना कुस्तीपटू व्हायचे आहे किंवा जे युवा कुस्तीपटू आहेत अशा प्रत्येकाने तर हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच माजी सुभेदार असलेले उत्तमराव यांचा परिचय देण्यात आला आहे. त्यांचा परिचय वाचताना प्रत्येक कुस्तीगीराची छाती अभिमानाने भरून येईल. त्याचवेळी त्यांनी कुस्तीतील नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मल्लांचीही माहिती छायाचित्रांसह दिली आहे. पुस्तकाची सुरुवात ‘निवड कुस्तीची’ या लेखाद्वारे होते. त्यात कुस्ती साधारण कोणत्या वयात सुरू करावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सराव कसे करावेत, याचीही माहिती ‘सरावाची पद्धती’मध्ये छायाचित्रांचे मार्गदर्शन करून दिली आहे. कुस्तीगीरांच्या खुराकाला नेहमीच महत्त्व असते. ते पाहता ‘आहार’ हा लेखही प्रत्येक कुस्तीगीराने संग्रही ठेवावा असा आहे. कोणते पदार्थ खावेत याचे अतिशय बारकाईने वर्णन त्यात वाचायला मिळते. उत्तमरावांनी स्वत: राज्यातील कुस्तीगीरांच्या आहारावर पीएच.डी. केल्याने त्यांचा त्याविषयीचा अभ्यास कौतुकास्पद आहे. खेळात सातत्य, वजनी गट आदींना किती महत्त्व आहे, हेदेखील वाचायला मिळते. कुस्तीत डाव कसे खेळावेत, याचेही सचित्र वर्णन करण्यात आले आहे. माती आणि मॅटवरील कुस्तीत सराव करताना फरकही समजावून सांगितला आहे. डोपिंगमुळे नुकसान किती होऊ शकते, ही माहिती तर पुस्तकाची शोभा वाढवते. डोपिंगचे अतिशय बारकाईने यात वर्णन देण्यात आले आहे. अद्ययावत कुस्ती नियमांचे ज्ञान, कुस्तीमध्ये महिलांचा प्रवेश, शिक्षण व कुस्ती, पहेलवानांची मानसिकता, पालकांची मानसिकता आदी लेखही ज्ञानात भर टाकतात. एकंदरीत प्रत्येक कुस्तीपटूने किंवा कुस्तीप्रेमीने हे पुस्तक वाचायलाच हवे.
कुस्तीगीर
पानं : ६८
किंमत : ५० रुपये