फलंदाज वरचढ असले तरी फलंदाजीच्या नियमांत बदल करण्याची आवश्यकता नाही, असे डब्लूसीसीने स्पष्ट केले आहे.
लंडन- क्रिकेट खेळ सध्या फलंदाजांना अधिक अनुकूल असल्याचे दिसत असले तरी जागतिक क्रिकेट समितीला (डब्लूसीसी) तसे वाटत नाही. फलंदाज वरचढ असले तरी फलंदाजीच्या नियमांत बदल करण्याची आवश्यकता नाही, असे डब्लूसीसीने स्पष्ट केले आहे.
‘फलंदाजी आणि गोलंदाजीची तुलना केल्यास फलंदाजांचे तितके वर्चस्व वाटत नाही. दोन्हींमध्ये ब-यापैकी समतोल आहे. सध्या वापरात असलेल्या बॅटचा आकार तसेच फलंदाजीच्या नियमांबाबत डब्लूसीसीमध्ये एकमत नसले तरी मेरिलबोन क्रिकेट समितीने (एमसीसी) यापुढेही खेळाबाबत असेच अवलोकन करावे,’ असे एमसीसीच्या अधिकृत वेबसाइटवरील अहवालात सांगण्यात आले आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजांचा वरचष्मा असल्याचा निष्कर्ष गेले दशकभर काढला जात आहे.
या पार्श्वभूमीवर एमसीसीने लंडनमधील इम्पेरियल कॉलेजला बॅटच्या आकाराबाबत संशोधन करण्यास सांगितले होते. सध्या क्रिकेटमध्ये ३८ इंच लांबीची तसेच चार इंच रुंदीची बॅट वापरण्यास परवानगी आहे.
सध्या वापरात असलेली बॅट फलंदाजीसाठी योग्य असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. १९७९ नंतरच्या एकदिवसीय लढतींचा विचार करता नव्या बॅटमुळे चौकार आणि षटकारांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे. चौकार आणि षटकार लगावल्यानंतर चाहत्यांच्या मानसिकतेबाबतही डब्लूसीसीमध्ये चर्चा झाली.