आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगळूरू शहर सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे.
बंगळुरु- आयटी हब म्हणून ओळखले जाणारे बंगळूरू शहर सामुहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील पिडीत तरुणी ही मुळची मध्य प्रदेश येथील ग्वालियर शहरातील असून ती बंगळूरू येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास आहे. ती बंगळूरूमधीलच एका कॉल सेंटरमध्ये काम करते. शनिवारी रात्री १० वाजता ही तरुणी आपले काम संपवून घरी जाण्यासाठी निघाली होती.
मात्र वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने ती होसूर रोड येथे रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभी होती. याचवेळी एका टेम्पो ट्रॅव्हलरमधून आलेल्या काही तरुणांनी तिला लिफ्ट घेण्याची विचारणा केली. यावेळी घरी जाण्याची घाई असल्याने ती तरुणी टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसली आणि तिचा घात झाला.
टेम्पो ट्रॅव्हलरमधील त्या नराधम तरुणांनी पिडीत तरुणीला घरी सोडण्याऐवजी एका निर्जन स्थळी नेऊन गाडी उभी केली आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवत तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. या प्रकारानंतर त्यांनी पिडीत तरुणीला पुन्हा एकदा होसूर रोड येथे आणून सोडले. शिवाय तिला या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत हे तरुण पसार झाले.
यानंतर या तरुणीने पोलिसांत धाव घेत झाल्या प्रकारची तक्रार केली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला असून होसूर रोड येथील सीसीटीव्हीचे फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शिवाय याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यातही घेण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.