मुंबईसह राज्यात ‘एच१एन१ विषाणूंनी पुन्हा डोके वर काढले असून आतापर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई- मुंबईसह राज्यात ‘एच१एन१ विषाणूंनी पुन्हा डोके वर काढले असून आतापर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूचे २३ रुग्ण आढळून आले आहेत. यात १० मुंबईतील रुग्ण असून अन्य १३ परदेशातून मुंबईत उपचारार्थ दाखल झाले होते. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली. दरम्यान, नागपूर, लातूर येथेही स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत.
पालिकेत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, खासगी रुग्णालयात सध्या १२ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर ४ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. तसेच अन्य तिघांना उपचारानंतर घरी सोडले आहे. पालिका रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी विशेष सोयीसुविधा पुरविण्यात आल्या असून प्रत्येकखासगी तसेच सरकारी रुग्णालयात प्रत्येक २ व्हेंटिलेटर मशिनची सुविधा दिली आहे.
हा आजार संसर्गजन्य आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिला. स्वाईन फ्लू रुग्णांची माहिती कळवण्यासाठी पालिकेने २४११४००० ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर स्वाईन फ्लूबाबत संपूर्ण माहिती मिळू शकेल.
१९ जानेवारीपासून मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले. आतापर्यंत पालघर, ठाणे येथून १३ रुग्ण आढळून आले असून यात ७ महिला आणि ६ पुरुष आहेत. तर सांताक्रूझ, वांद्रे, माहीम, मालाड, कांदिवली, गोरेगाव, अंधेरी येथून १० जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे आढळले. स्वाईन फ्लूच्या २३ रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जळगावच्या पुरुषाचा आणि बदलापूरमधील महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.
पालघरच्या महिलेचा अंधेरीतील हॉली स्पिरीट रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय एका रुग्णाचा जसलोक रुग्णालयात मृत्यू झाला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.