शेवगाव येथे अल्पवयीन मुलीचे मोबाइलवर फोटो काढून संगणकाच्या सहाय्याने ते फोटो अश्लील बनवण्यात आले. त्यानंतर सातत्याने या तरुणीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक पोलिस कॉन्स्टेबल, ग्रामपंचायत सदस्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
अहमदनगर- जिल्ह्यातील शेवगाव येथे अल्पवयीन मुलीचे मोबाइलवर फोटो काढून संगणकाच्या सहाय्याने ते फोटो अश्लील बनवण्यात आले. सातत्याने या तरुणीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक पोलिस कॉन्स्टेबल, ग्रामपंचायत सदस्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पोलिस कॉन्स्टेबल दीपक अशोक शेंडे (रा. कुकाणे, तालुका शेवगाव), शेवगाव ग्रामपंचायत सदस्य संजय भगवान नांगरे, बाळू भगवान नांगरे, चंद्रभान भगवान नांगरे व एक अल्पवयीन आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी संजय नांगरे, बाळू नांगरे व अल्पवयीन आरोपी अशा तिघांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणी अत्याचारित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यामध्ये म्हटले आहे की, २३ जुलै २०१३ रोजी सकाळी शाळेत जात असताना पोलिस कॉन्स्टेबल शेंडे व बाळू नांगरे या दोघांनी खुनाची धमकी देऊन जबरदस्तीने मोटारसायकलवरून नेले. करंजी घाटाच्या पायथ्याशी दाट झाडीमध्ये नेऊन बाळू नांगरेने बलात्कार केला. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल शेंडे मोटारसायकल घेऊन तेथे उभा होता. नंतर दोघांनी पुन्हा या तरुणीला शाळेजवळ आणून सोडले. ऑगस्ट महिन्यात व नंतर ऑक्टोबरमध्ये बाळू नांगरेने पुन्हा एकदा बळजबरीने त्याच्या घरी नेऊन अत्याचार केला. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना पोलिस कॉन्स्टेबल दीपक शेंडे, संजय नांगरे, बाळू नांगरे, चंद्रभान नांगरे व एक अल्पवयीन आरोपी यांनी रस्त्यात अडवून जिवे मारण्याची धमकी दिली, असे पीडित तरुणीने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिसांनी बाळू नांगरेच्या विरुद्ध बळवून नेऊन बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. बाळू नांगरेला मदत करणे, अत्याचारित तरुणीला व तिच्या कुटुबीयांना धमकी देणे, अश्लील चित्रफीत काढणे असे गुन्हे अन्य चार आरोपींच्या विरुद्ध दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे.