भ्रष्टाचारप्रकरणी खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरुन बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलीदा झिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
ढाका – भ्रष्टाचारप्रकरणी खटल्याच्या सुनावणीदरम्यान अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरुन बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलीदा झिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे.
देशात सुरु असलेल्या राजकीय अशांतेमुळे त्यांच्या सुरक्षेचे कारण पुढे करत झिया यांनी न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी परवानगी मिळावी अशी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायमूर्ती अबू अहमद जमाद्देर यांनी ही याचिका फेटाळून लावली. झिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला असला तरी मात्र त्यांना लवकरच अटक कऱण्यात येणार आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
झिया यांनी चॅरिटीच्या नावाने जमीन खरेदी करण्यासाठी अनधिकृत निधी वापरल्याचा आरोप यांच्यावर करण्यात आला आहे. दहा लाख अमेरिकन डॉलरचा निधी अनधिकृतरित्या जमवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकऱणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
दरम्यान, झिया यांच्यावकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर आपल्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे झिया यांनी म्हटले आहे.