हल्ली गृहसजावट करताना आपल्या घराची सजावट अधिकाधिक इको फ्रेंडली कशी करता येईल याकडे लोकांचा अधिक कल दिसून येतो. त्यातही बांबूची सजावट करण्याचा ट्रेंड सध्या झपाटय़ाने वाढतोय, असं म्हटलं तरी चालेल. पर्यावरणाला पुरक असलेल्या या बांबूच्या साहाय्याने घराची सजावट कशी करता येईल हे जाणून घेऊ या.
हल्ली घराची सजावट म्हटली कुठे ना कुठे तरी आपल्याला केमिकल आणि कीटकनाशकांचा सामना करावाच लागतो. मग तो रंग असो वा कोणतंही फर्निचर स्वच्छ करण्याचं काम असो. आपला केमिकलशी संबंध येतोच. त्या दृष्टीने गृहसजावटीत बांबूचा केलेला वापर हा गृहसजावटीचा अतिशय सुरक्षित पर्याय आहे. बांबूची सजावट ही दिसायला तर उत्तम असतेच पण त्याचबरोबर ती पर्यावरणाला पुरकही असते. पण आपल्याकडे बांबूची सजावट म्हटली की केवळ एक सिंगल झोपाळाच डोळ्यांसमोर येतो.
खुर्ची, फर्निचर आणि फ्लोअरिंग वळगता अन्य कोणत्या गोष्टींचा आपण विचारच करत नाही. मात्र तुमच्या संपूर्ण घराच्या सजावटीत बांबूच्या कित्येक गोष्टींचा वापर तुम्हाला करता येतो. कदाचित बांबूचं फर्निचर साफसफाई करायला कठीण आहे किंवा ते छान दिसत नाही असं वाटत असल्यामुळे आपण ते घरात ठेवत नाही. वास्तविक पाहता बांबू किंवा वेताच्या वस्तू स्वच्छ करायला सोप्या असतात आणि त्या टिकतातही चांगल्या. तसंच त्यावर आपल्या हाताचे ठसे उमटत नाहीत. मात्र नव्या जमान्याला अनुसरून यात कित्येक डिझाईन्स आल्या आहेत. या ट्रेंड्सची आपण माहिती घेऊ या.
दिवाणखाना
दिवाणखाना म्हणजे पाहुणे मंडळींची उठबस करण्याची जागा. साहजिकच आल्या-गेलेल्यांसाठी बसायला जागा हवी. या ठिकाणी पाहुण्यांची उठबस करण्यासाठी तुम्ही छानपैकी वेताचा सोफा ठेवू शकता. तसंच त्याला साजेसं असं समोर वेताचंच टीपॉयही ठेवू शकता. असा सोफा सेट आणि त्यावर विविध रंगांच्या कुशन कव्हर्सचं कॉम्बिनेशन करून बैठकीची व्यवस्था केली की त्याला खूप चांगला लूक येतो. तिथेच या सोफा सेटच्या कोप-यात एखादा टांगता दिवादेखील छान दिसतो. बांबूच्या काडय़ांच्या प्रकाशातून पडणारा दिव्याचा मंद प्रकाश तुमच्या दिवाणखान्याला वेगळीच शोभा आणतो. कोप-यातल्या टेबलावर बांबूच्या माध्यामातून तुम्ही आकर्षक वास आणून ठेवू शकतात. त्यावर कलाकुसरही करता येते. आणि हे वास दिसायलाही छान दिसतात. अगदी एक-दोन फुलांच्या काडय़ांपासून ते भरगच्च पुष्पगुच्छापर्यंत तुम्हाला हव्या त्या आकारात हे वास करून मिळतात. या दिवाणखान्याची शोभा आणखी वाढवायची असेल तर एखादं वॉलपीसही तुम्ही लावू शकता. पूर्वी पतंगाच्या आकारात असलेलं चौकटीचं वॉसपीस तुम्हाला पाहिल्याचं आठवत असेल. तसं वॉसपीस एखाद्या भिंतीवर लावलं तर दिवाणखान्याची शोभा वाढल्याशिवाय राहत नाही. तुमचं घर मोठं असेल आणि वर गच्ची किंवा खोल्या असतील तिथल्या जिन्याजवळचं रेलिंगही तुम्ही बांबूचं करू शकता. तसंच काही वेळेला मोठा दिवाणखाना असला की त्यात पार्टिशन घालून त्याच्या दोन खोल्या केल्या जातात. हे पार्टिशनदेखील तुम्ही बांबूचं करून घेऊ शकता. जास्तीचे पाहुणे आले आणि त्यांनी सोफ्याची जागा व्यापली तर घरातल्यांनी बसायचं कुठे असा प्रश्न असतो. अशा वेळी डमरूप्रमाणे गोल किंवा चौकोनी आकाराची स्टुल तयार करून त्यावर छोटीशी फोमची गादीदेखील मिळते. अशी स्टुल्स वजनाला हलकी पण अतिशय उपयुक्त असतात. पाहुण्यांना वाचायला ठेवण्यासाठी काही जण वर्तमानपत्र टीपॉयखाली किंवा मग पेपर होल्डर्समध्ये ठेवतात. हे पेपरहोल्डर्सदेखील बांबूचेच ठेवले तर एकूणच बांबूच्या वस्तूंचा छान सेट पाहायला मिळेल.
व्हरांडा किंवा गच्ची
घर लहान असेल तर कित्येक जण त्यांच्या चपला घराबाहेरच्या स्टँडवरच ठेवतात. हा स्टँड बांबूचा असेल तर छान दिसतो. तसंच तुमचा व्हरांडा मोठा असेल किंवा छोटासा टेरेस असेल तर तुम्ही तिथे तो टांगता खुर्चीसारखा दिसणारा अंडाकृती झोपाळा लावू शकता. त्यातही आता भरपूर प्रकार आले आहेत. म्हणजे पूर्वीचा एकाच माणसासाठी असलेल्या या झोपाळ्यात आता दोन जणांची बसण्याची जागाही उपलब्ध असते. व्हरांडय़ातही तुम्ही लहान स्टुल्स ठेवू शकतात. तसंच कुंडय़ा ठेवायला बांबूचे स्टँडही तुम्हाला बाजारात मिळू शकतात. दुपारच्या वेळी टेरेसमध्ये बसण्यासाठी ज्या ठिकाणी ऊन येईल, अशा ठिकाणी तुम्ही बांबूचे पडदेही लावू शकता.
बेडरूम
आता तुम्ही म्हणाल, दिवाणखान्यात इतकं सगळं केलं की बेडरूमची सजावट करायला बांबूचा आणखी काय प्रकार राहिला आहे. बेडरूममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मोठा बेड. या मोठय़ा बेडसाठी तुम्ही बांबूचा वापर करू शकता. तुम्हाला कल्पना नसेल पण हे बेड टिकायला मजबूत असतात आणि वजनानेदेखील हलकेच असतात. बेड बांबूचा म्हटला की त्याच्या आजूबाजूची साईड टेबल्सही बांबूची आली. त्या साईट टेबलांवरदेखील तुम्ही दिवाणखान्याप्रमाणे लहान वास ठेवू शकता. त्यात फुलं ठेवली की बेडरूमला शोभा आलीच म्हणून समजा. बेडरूममध्ये बेडच्या मागे किंवा आजूबाजूच्या भिंतीवर कित्येक जणांना फोटोफ्रेम लावायची आवड असते. या फोटोफ्रेमची चौकटही तुम्ही बांबूची निवडू शकता. इतकंच नव्हे तर बांबूपासून तयार केलेलं एखादं छानसं झुंबरही तुमच्या बेडरूमची शोभा वाढवेल. काही महत्त्वाची कागदपत्र आपण दिवाणखान्यात न ठेवता बेडरूममध्ये ठेवतो. उदा. लाईट बिल, गॅस बुक वगैरे. अशी महत्त्वाची कागदपत्रं ठेवण्यासाठी एक छोटंसं भिंतीवर लावता येईल. त्यात तुमची महत्त्वाची कागदपत्रं अगदी सहज राहू शकतात.
किचन
किचन म्हटलं की असंख्य वस्तूंचा भरणा आपल्या डोळ्यांसमोर येतो. किचनमध्ये बांबूचा वापर करायचा झाला तर तिथे असलेल्या वस्तूंचा विचार करणं आवश्यक आहे. त्यानुसार भिंतीवर लावण्यात येणारं किंवा जमिनीवर ठेवल्या जाणा-या शेल्फचा विचार करणं आवश्यक आहे. बांबूचे शेल्फ आकाराने ऐसपैस असतात. त्यावर ब-याच वस्तू राहू शकतात. तसंच ओटय़ावर काही जण काही जिन्नस ठेवतात. त्यासाठीदेखील बांबूचे ट्रे तुम्ही ठेवू शकता. तसंच कच-यासाठी तुम्ही कच-याचा डबा किंवा वॉशिंग मशीन धुवायला देण्यासाठी ठेवावे लागणारे कपडे ठेवण्यासाठी लाँड्री बॉक्सही ठेवू शकता. हे बॉक्स अतिशय आकर्षक दिसतात.