आठवडयाभराच्या अथक शोध मोहिमेनंतरही मलेशियन एअरलाईन्सचे बेपत्ता प्रवासी विमान सापडत नसल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
वॉशिंग्टन – आठवडयाभराच्या अथक शोध मोहिमेनंतरही मलेशियन एअरलाईन्सचे बेपत्ता प्रवासी विमान सापडत नसल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
मलेशियन एअरलाईन्सच्या बेपत्ता विमानाव्दारे भारतावर ९/११ सारखा दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी शक्यता अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री स्ट्रॉब टलबॉट यांनी व्यक्त केली आहे.
बिल क्लिंटन सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री राहिलेल्या टलबॉट यांनी टि्वटरवर ही टिप्पणी केली आहे. विमानाची दिशा, त्यातील इंधन आणि टप्पा विचारात घेतला तर, अपहरणकर्त्यांची भारतातील एखाद्या शहरावर ९/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची योजना असू शकते असा संशय टलबॉट यांनी आपल्या टि्वटमध्ये व्यक्त केला आहे.
टलबॉट यांना कुठल्या आधारावर असे वाटते याला अजूनपर्यंत तरी कोणतेही प्रमाण नाही. आठवडयाभरापासून शोध लागत नसलेल्या या विमानाचे अपहरण झाल्याचा निष्कर्ष मलेशियन तपास यंत्रणांनी काढला आहे.
विमान रडारवर दिसू नये यासाठी दक्षिण व्हिएतनामच्या समुद्रावर असताना, विमानाची सर्व संर्पक यंत्रणा बंद करण्यात आली. विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाक्षी संर्पक तुटल्यानंतर हे विमान लष्करी रडरावर दिसले होते. हे विमान कझाकिस्तान-तुर्कमेनिस्तानच्या दिशेने गेल्याचा तपासकर्त्यांना संशय आहे.