नायजेरियामध्ये बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी शेकडो महिलांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
दलोरी (नायजेरिया)- नायजेरियामध्ये बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी शेकडो महिलांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यामधील काही मुली/महिला या बोको हराममध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या मुली आणि पत्नी असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
बोको हरामची नवी पिढी तयार करण्यासाठी या महिलांना गर्भवती करण्यासाठी त्यांच्यावर वारंवार बलात्कार करण्याचे सैतानी कृत्य हे नराधम करत आहेत, अशी माहिती यातील एका पिडीत महिलेने दिली.
महिला आणि मुलींचे अपहरण करुन त्यांना बळजबरीने दहशतवाद्यांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. विरोध केल्यास त्यांना बंदूकीने ठार मारण्याची धमकी दिली जाते.
यातील एका पिडीत २५ वर्षीय महिलेचा बाप बोको हराम या दहशतवादी संघटनेत सामिल झाला आहे. या बापाच्या सांगण्यावरुनच तेथील दुस-या एका दहशतवाद्याने गर्भवती रहाण्यासाठी तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले.
या अत्याचाराच्या वृत्ताला नायजेरियातील मदत कार्य पुरवणा-या कार्यकर्ते आणि अधिका-यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते ग्रामीण भागात या दहशतवादी संघटनेने हैदोस घातला आहे.
गेल्या वर्षी (एप्रिल २०१४) बोको हरामने नायजेरियामधील ३०० मुलींचे अपहरण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये खळबळ उडाली होती. बोको हरामच्या म्होरक्याने या मुलींना बाजारात विकण्याची धमकी दिली होती. तसेच यातील नऊ ते १२ वर्षाच्या मुलींशी लग्न करणार असल्याचे एका व्हिडिओद्वारे सांगितले होते.
बोको हराम ही नायजेरियामधील मूलतत्त्ववाद्यांची दहशतवादी संघटना असून त्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. नायजेरिया हा मध्य पश्चिम आफ्रिकेतील अतिशय मागास देश आहे.
आतापर्यंत १५०० महिलांची नायजेरियन सैन्याने सुटका करुन त्यांना पुनर्वसन शिबीरात ठेवले आहे. त्यातील २०० हून अधिक महिला गरोदर असल्याचे निदर्शनास आले आहे.
[EPSB]
बोको हरामचा आतंक, २० महिलांचे अपहरण
बोको हराम या दहशतवादी संघटनेने उत्तर नायजेरियामधील छिबॉक या गावामधून २० महिलांचे अपहरण केल्याचे वृत्त बीबीसी न्यूजने दिले आहे.
[/EPSB]