शिवसेनेच्या दडपशाहीला कंटाळून ठाण्यातील शिवसेनेच्या २०० कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ठाणे- शिवसेनेच्या दडपशाहीला कंटाळून ठाण्यातील शिवसेनेच्या २०० कार्यकर्त्यांनी शनिवारी काँग्रेस प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, यातील निम्मे कार्यकर्ते हे शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.
ठाणे येथील इंदिरानगर, हनुमाननगर, खपादेवी टेकडी, प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मधील हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. शनिवारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखाप्रमुख संभाजी, कुराडे, उपविभागप्रमुख जितेंद्र गाढवे, उपशाखाप्रमुख कृष्णकुमार सिंह सोडारी, परमात्मा उपाध्याय, माजी उपशाखाप्रमुख सुरेश फोंडेकर, महिला विभाग संघटक वंदना सरफरे, शाखा संघटक सुरेखा चव्हाण, गटप्रमुख सीतासिंह सोडारी, शोभा कुऱ्हाडे, कांचन पाटील, विजयमाला शिंदे यांच्यासह २०० शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
तसेच भारिपचे सुनील कांबळे, संजय आचार्य, मनसे वॉर्ड उपाध्यक्ष राजेश सरोज, मनसे ठाणे शहर सल्लागार वैभव देशपांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळाकृष्ण पूर्णेकर, प्रदेश सचिव मनोज शिंदे, ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका निवडणुकीपासून शिवसेनेला भगदाड पाडण्याचे काम रवींद्र फाटक यांनी केले आहे. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातून रवींद्र फाटक यांनी काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आणले. आता याच मतदारसंघातील निम्मी शिवसेना रिती करून काँग्रेसने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेना आमदार-खासदार काँग्रेसच्या संपर्कात
शिवसेनेतील आमदार-खासदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात ठाण्यासह राज्यात काँग्रेस शिवसेनेला धोबीपछाड देणार असल्याची चर्चा ठाणे शहरात आहे.