घरातील भिंती आणि घड्याळ यांचे जुने नाते आहे. नव्वदीच्या दशकापर्यंत प्रत्येक घरातील भिंतीवर हमखास घड्याळ असायचे. विविध प्रकारच्या आणि ‘स्टाईल’च्या घड्याळांमुळे भिंतीच्या सौंदर्यामध्ये भर पडायची. मात्र हल्ली घर, इमारत आणि बंगले यांच्यातील भिंती ब-याच अंशी रिकाम्या असतात. काही ठिकाणी एखाद् दुसरे पोस्टर किंवा एखादे पेटिंग्ज असते.
घड्याळांचे अनेक प्रकार आहेत. सर्वाधिक घड्याळे ही गोलाकार असतात. मात्र त्यांना वेगवेगळय़ा डिझाइन्समध्ये बसवले जाते. लंबकाची घड्याळे त्यांच्या रंगांसह कर्णमधुर (टोल) आवाज सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. अशी घड्याळे आता क्वचितच दिसतात.
षटकोनी आणि चौकोनी स्वरूपातील घड्याळेही आकर्षक असतात आणि भिंतीचे सौंदर्य खुलवतात. घडाळय़ाच्या पार्श्वभागातील वेगवेगळे रंग भिंतींना सजवण्यासाठी पोषक ठरतात. भिंतीच्या रंगाना अनुकूल घड्याळे लावलेली पाहायला मिळतात. पारंपरिक घड्याळे आता कालबाहय़ झालेली दिसतात. तसेच हल्लीच्या भिंती घड्याळांविना सजलेल्या दिसतात. डिजिटल घड्याळांमुळे पूर्वीची घड्याळे मागे पडली नाहीत. लंबकाची घड्याळे तर केवळ वास्तुसंग्रहालयामध्ये पाहायला मिळतात.
घरातील भिंती आणि घड्याळांचा संबंध आता कमी झाला आहे. घडाळय़ांची जागा आता अन्य कुणीतरी घेतली आहे. मात्र पूर्वीच्या भिंती बोलक्या वाटायच्या. आताच्या भिंती रूक्ष आणि एकटय़ा भासतात.
घरातील घड्याळ योग्य दिशेला ठेवा
धकाधकीच्या जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण स्थान असते घड्याळाचे. केवळ घराच्या भिंतीवर घड्याळ लावून दिल्याने जीवनात यश मिळत नाही. काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. घड्याळासंबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात घेतल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या निश्चितच दूर होतील आणि यश मिळेल.
घड्याळ नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेकडील भिंतींवर लावावे
पश्चिम दिशेतही घड्याळ लावायला हरकत नाही. पण दक्षिण दिशेच्या भिंतीवर चुकूनही घड्याळ लावू नये. दक्षिण दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावल्याने तुमचे लक्ष वारंवार घड्याळाकडे जाऊ शकते. परिणामी, दक्षिण दिशेकडून येणा-या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या कामात निरंतर समस्या येत राहतील.
- नेहमी घड्याळ अशा जागी लावावे. जिथून ते सर्वांना आरामात दिसू शकते.
- भिंतीवर लावलेल्या घड्याळाची सफाई करत राहावी. त्यावर धूळ साचता कामा नये.
- काच तुटलेली घड्याळे तातडीने बदलायला हवी. अशा घड्याळय़ांमुळे कुटुंबाच्या सदस्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो.
सजावट म्हणून मधुर संगीत किंवा ध्वनी उत्पन्न करणारी घड्याळे घरातील ब्रह्मस्थान स्थित लॉबीमध्ये लावावी. याचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा असा की, तुम्हाला व कुटुंबातील लोकांना प्रगतीची संधी लाभेल. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
स्वत:ची सोय किंवा सवय म्हणून घड्याळाची वेळ नियत वेळेपेक्षा मागे सेट करून ठेवू नये. याउलट घड्याळ योग्य वेळेहून १०-१५ मिनिटे पुढे ठेवली तर आपल्याला योग्य दिशा मिळेल. यामुळे तुमची प्रगती होऊ शकते.
रंगसंगती आणि व्यक्तिमत्त्व
घरातील वस्तूंची निवड, रंगसंगती, मांडणीतील कलात्मकता, शोभेच्या वस्तूंचे संग्रह यातून कुटुंबातील व्यक्तींच्या आवडी-निवडी चोखदळपणा, थोडक्यात त्यातून त्या त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होते. म्हणून घरातील सर्व वस्तूची पारख काळजीपूर्वक करावी. वस्तूंची निवड, मांडणी आणि वापर यासंबंधी काही उपयुक्त सूचनांचा विचार करू.
जमिनीचे रंग मंद असावेत. भिंती या खोलीतील सर्वसामानांच्या मांडणीसाठी पार्श्वभूमी म्हणून वापरल्या जातात. म्हणून त्या फिक्या रंगाच्या असाव्या. छत सर्वात फिके असावे. काळोख्या खोलीत पिवळसर किंवा लालसर रंगाच्या छटा तर खूप प्रकाश असणा-या खोलीत निळसर किंवा हिरवट रंगाच्या छटा वापराव्या. सिमेंटच्या नवीन प्रकारच्या फरशांवर खूप गडद ठिपके असतात, त्यामुळे कचरा दिसत नाही. शिवाय पाणी पडलेले असल्यास ते न दिसून माणूस पडण्याची भीती असते.
खोलीतील सामानाचे कृतीनुसार विभाग पाडावे. वस्तू वापरताना अडथळा येणार नाही, जाण्यायेण्यास पुरेशी जागा राहील, केर काढणे-पुसणे गैरसोईचे होणार नाही हे लक्षात ठेवून सामानाचे समूह आकर्षक दिसतील असे मांडावे.
एकाच खोलीत विविध रंग आणि विविध छापांची (डिझाईन) सजावट वापरू नये. सजावट आहे अशा पुष्पपात्रात रंगीबेरंगी फुले भरून प्रिटेंड टेबलक्लॉथवर ठेवली तर सर्व सजावट एकत्र होऊन ते अनाकर्षक दिसते. म्हणून सुंदर लॅपशेड, पुष्परचना, चित्रांच्या फ्रेम्स यांना पुरेशी मोकळी पार्श्वभूमी ठेवावी. स्वयंपाकाच्या ओटय़ालगतच्या भिंतीशी फरशी बसवावी. फोडणीचे वगैरे डाग भिंतीवर पडत नाहीत व धुवून स्वच्छ ठेवणे सोपे जाते. स्वयंपाकघरात सारख्या आकाराच्या बरण्या, बाटल्या, वाटय़ा, भांडी यांचे समूह नेहमीच मांडले जातात. ते आकर्षक दिसतात. बरण्या, बाटल्या पारदर्शक वापराव्या म्हणजे वस्तू चटकन सापडतात. पुष्ठय़ांवर आकर्षक सजावट करून कोरे कागद आणि पेन्सिल अडकवण्याची सोय करून एखादी नोंदवही ठेवावी. संपलेल्या वस्तू साधनांची दुरुस्ती, निरोप इत्यादी गोष्टी त्यावर सोयीप्रमाणे टिपून ठेवता येतात.
जागेअभावी एकच खोली अनेक, कृतीसाठी वापरली जाते. बहुउद्देशीय फर्निचर आणि मांडणीत लवचिकता ठेवून खोलीची मांडणी गरजेप्रमाणे बदलून घ्यावी. दारामागच्या जागा, पोटमाळे, दिवाणाखाली कपाट करणे, कपाटाचे दार डायनिंग टेबलप्रमाणे वापरणे अशा योजना करून जागेचा जास्तीत जास्त वापर करावा. वस्तूवरील कापडी आच्छादने (टेबल क्लॉथसारखी) धुतल्यावर स्टार्च इस्त्री करून वापरावी म्हणजे त्यांचे नावीन्य टिकून राहते. पडद्यांना अस्तर लावावे. घरांतील मोठे सामान वरचेवर बदलता येत नाही. म्हणून नावीन्यासाठी चित्र, पुष्परचना, टांगायच्या कुंड्या, घरात वाढणा-या लहान झाडांच्या कुंड्या व इतर शोभेच्याच वस्तूंचा वापर करावा. यातील विशेषत: शोकेसमध्ये सर्वच वस्तू एकदम मांडू नयेत. विशिष्ट कल्पनेशी मिळत्या जुळत्या वस्तूंचेच संग्रह मांडावे.
चित्रांबाबतीतही ही दक्षता घ्यावी. मधून मधून या वस्तू बदल्यामुळे घरात नावीन्य टिकून राहाते. लाकडी फर्निचर ठरावीक कालावधीनंतर घरीच पॉलिश करावे. बाजारात तयार फ्रेंच पॉलिश मिळते. लाकडावरील रेषांच्या दिशेने हे पॉलिश मऊ कापडाने लावावे. एक हात लावल्यावर दुसरा हात द्यावा. लाकडी वस्तूंवर थेट ऊन येऊ देऊ नये. तसेच पाण्याचे डाग न पडण्याची दक्षता घ्यावी. काचेच्या खिडक्या, कपाटे किंवा टेबल, आरसे स्वच्छ करण्यासाठी पाणी हलक्या हाताने शिंपडून कागदाने पुसून घ्यावे. कोरडे पुसायचे असल्यास मलमलसारखे कापड वापरावे. पाण्याचे ग्लास ओटय़ावर चिकटून पालथे न घालता किंचित फट राहील, असे कलते घालावे. म्हणजे आतून बाहेरून कोरडे होतात. चार भिंतीचा आडोसा म्हणजे घर नव्हे. त्या घराला घरपण मिळाल पाहिजे, तरच घर ख-या अर्थाने सुंदर होईल.
वास्तुप्रमाणे घरात झाडे लावा!
वास्तुशास्त्राप्रमाणे घरात सजावटीसाठी ठेवण्यात येणा-या झाडांचा आमच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. नकळत आम्ही अशी काही झाडे घरात लावतो. ज्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतो. घरात कोणती झाडे लावावी आणि लावू नये, याची आपण माहिती घेऊ.
घरात मनीप्लान्ट लावणे शुभ असते. मनीप्लांट शुक्र ग्रहाचा घटक असून या झाडामुळे पती-पत्नीचे संबंध मधुर राहतात.
घरात काटेरी किंवा असे झाडे लावू नये. ज्यातून दुधासारखा पांढरा द्रव बाहेर येतो. काटे नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात. गुलाबासारखी काटेरी झाडे लावायला हरकत नाही. तरीही त्यांना घराच्या गच्चीवर लावणे आणि ठेवणे अधिक चांगले ठरेल.
बांबूचे झाड शुभ मानले जातात. फेंगशुईप्रमाणे बांबूचे झाड सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
दुकानात किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी फुलदाणीत दररोज ताजी फुले ठेवायला हवी. वाळलेली फुले नकारात्मकता पसरवतात.
डायनिंग रूम किंवा ड्रॉइंगरूममध्ये कुंड्या ठेवायला हरकत नाही. पण बेडरूममध्ये कोणत्याही प्रकाराची झाडे लावू नये. त्यामुळे वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो.
कधीही बोन्साय झाडे लावू नये. वास्तुशास्त्राप्रमाणे बोन्साय झाडांमुळे घरातील लोकांचा आर्थिक विकास थांबतो.
शौचालय आणि स्नानघर
वास्तुशास्त्रानुसार, शौचालय आणि स्नानघर यांच्यामध्ये वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीसह आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे घरात असलेल्या स्नानगृह आणि शौचालय याचा वास्तूदोष दूर करून घेणे, आवश्यक आहे.
वास्तुशास्त्रनुसार, शौचालय आणि स्नानघर एकत्र नसले पाहिजे. मोठय़ा शहरांमध्ये जागा कमी असल्याने स्नानघर आणि शौचालय हे बहुतेकदा एकाच ठिकाणी असतात. त्यामुळे एकत्र सुविधा मिळत असली तरी वास्तूदोष बनतो.
- शौचालयात काचेच्या वाटीत मीठ भरून ठेवा. तसेच मीठ आठवड्यातून एकदा बदलले पाहिजे.
- घरातील उत्तर पूर्व दिशेला शौचालय आणि स्नानघर असायला हवे. भिंतीवर उत्तर किंवा पूर्व दिशेला एक आरसादेखील लावा.
- शौचालयाच्या दक्षिण दिशेकडील भिंतीवर पिरॅमिड लावावे. त्यामुळे वास्तूदोष दूर होतो.
- स्नानघरामध्ये निळय़ा रंगाची बादली आणि मग वापरावा.
- शौचालय आणि स्नानघराचे दरवाजे नेहमी बंद ठेवा. तसेच दरवाजासमोर आरसा लावू नका.
वास्तुदोषाची लक्षणे
- घरातील व्यक्ती सारखी आजारी पडणे.
- घरात वरचेवर भांडण होणे.
- फायद्यापेक्षा जास्त खर्च होणे.
- घरातील लोकांची मानसिक स्थिती बिघडणे.
- घरात घुबडाचे दिसणे.
- घरात राहत असताना भीती वाटणे.
- रात्री वेगवेगळ्या प्रकाराचे आवाज येणे.
- सुरू असलेल्या कामांना अचानक पूर्णविराम.
- गृहक्लेश राहणे.
- वाईट स्वप्न दिसणे.
- लग्न किंवा संतानपक्षाकडून अवरोध.