अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील आमदार राम कदम यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
पुणे- अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील आमदार राम कदम यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राम कदम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. विधानसभा परिसरात पोलिस अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्यानंतर राज ठाकरे यांनी कदम यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. जनतेसाठी १८-१८ तास काम करणा-या पोलिसांना सन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. तेव्हापासून कदम पक्षनेतृत्वावर नाराज होते.
कदम यांनी घाटकोपर (पश्चिम) मतदारसंघात स्वतःची पकड मिळवली आहे. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे कदम भाजपमध्ये जातील याचा अंदाज आल्यामुळेच मनसेने दिलीप लांडे यांना या मतदारसंघातून तयारी करण्यास सांगितल्याचे कळते.