मुंबई – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सायंकाळी तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारीच पर्रिकर अमेरिकेतून गोव्यात आले होते.
उलटी होऊ लागल्याने काल त्यांना मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्वरित मुंबईला हलवण्यात आले. पर्रिकर सायंकाळच्या विमानाने मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचा धाकटा मुलगा आणि डॉ. कोलवाळकर मुंबईत दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जातील.
सध्या नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसुझा हेदेखील अमेरिकेलाच उपचारांसाठी गेले आहेत. ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर हे गेले तीन महिने मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोव्याचे दोन मंत्री अनुक्रमे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि कृषी मंत्री विजय सरदेसाई हे विदेशात खासगी भेटीवर गेले आहेत.
सरदेसाई येत्या २६ रोजी परत येतील, तर आरोग्य मंत्री विश्वजीत राणे २ सप्टेंबरला गोव्यात दाखल होतील. गेले काही आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठकाही होऊ शकलेल्या नाहीत. आजारी मंत्र्यांचा परिणाम प्रशासकीय कामावर होऊ लागला आहे. अमेरिकेतील स्लोन केटरिंन रुग्णालयात ११ दिवस उपचार घेतल्यानंतर पर्रिकर २२ ऑगस्ट रोजी गोव्यात दाखल झाले होते.