मसरत आलमने बुधवारी श्रीनगरमध्ये भारत विरोधी सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्य़े आलमने पाकिस्तानी झेंडा फडकवला तसेच पाकिस्तान समर्थनाच्या घोषणाही दिल्या.
श्रीनगर – काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन होताच ज्याच्या सुटकेवरुन संसदेसह देशभरात गदारोळ झाला तो फुटीरतवादी नेता मसरत आलमने पुन्हा एकदा देश विरोधी कृत्य केले आहे.
मसरत आलमने बुधवारी श्रीनगरमध्ये भारत विरोधी सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्य़े आलमने पाकिस्तानी झेंडा फडकवला तसेच पाकिस्तान समर्थनाच्या घोषणाही दिल्या.
देश विरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली चार वर्ष तुरुंगात असणा-या मसरत आलमची मागच्या महिन्यात सात मार्चला तुरुंगातून सुटका झाली होती. मुफ्ती मोहोम्मद सईद यांनी सत्तारुढ होताच लगेचच आलमच्या सुटकेचा निर्णय घेतला होता. त्याच्या सुटकेवरुन संसदेत जोरदार गदारोळ झाला.
संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले होते. अखेर मोदींना या मुद्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. आलमची सुटका नियमानुसार झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहाला सांगितले होते.
आलमची सुटका झाली असली तरी, यापुढे आलम आणि त्याच्या सहका-यांवर लक्ष ठेवले जाईल असे त्यांनी सभागृहाला आश्वासन दिले होते. आता मरसत आलमने उघडपणे पुन्हा एकदा देशविरोधी कृत्य केले आहे. आता नरेंद्र मोदी सरकार त्याच्यावर काय कारवाई करणार ? की, यावेळीही आलमची सुटका होणार.
४७ वर्षीय आलम फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा वारस समजला जातो. विविध गुन्ह्यांसह आंदोलनाच्यावेळी भारतीय सुरक्षा पथकांवर दगडफेक घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहेत.