माथेरानमध्ये वन विभाग विविध प्रकल्प राबवताना आणि कामे करताना वनव्यवस्थापन समितीला विश्वासात घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.
माथेरान- माथेरानमध्ये वन विभाग विविध प्रकल्प राबवताना आणि कामे करताना वनव्यवस्थापन समितीला विश्वासात घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वरमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती तेथील वनविभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबवत आहे. मात्र, माथेरानमध्ये असे उपक्रम राबवले जात नाहीत. या भागातील विविध पॉइंटवर मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. असे असताना विकासात्मक उपक्रमांच्या बाबतीत विचार केला जात नाही. त्यामुळे व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी महाबळेश्वरमध्ये जाऊन तेथील कामाची पाहणी केली व तसेच उपक्रम माथेरानमध्येही राबवण्याचे ठरवले आहे.
जनतेच्या सहकार्याने वनसंवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे काम वनविभागाचे आहे. त्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती आहे. या समितीमध्ये त्या ठिकाणचा वनपाल हा समितीचा सचिव असतो. त्यामुळे वनविभागाला समितीच्या कामावरही लक्ष ठेवता येते व सल्लेही देता येतात. मात्र, माथेरानमधील या समितीला कामे सुचवण्याचा व अंमलबजावणीचा करण्याचा अधिकार नसल्याचे चित्र आहे. वनविभागाचे वनाधिकारी वनव्यवस्थापन समितीला महत्त्व देत नाहीत. या बैठका होतात त्याही विशेष कुठल्याही ठोस अंमलबजावणीविना होतात. मात्र, माथेरानच्या संयुक्त वनसमितीमध्ये अनेक प्रस्ताव सादर केले जातात. मात्र, ढिसाळ कारभारामुळे ही कामे पुढे सरकत नाहीत.
माथेरानमधील विविध पॉइंटचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव नुकताच सादर करण्यात आला. मात्र, मंजूर कामाकडे दुर्लक्ष करण्याचे काम वनाधिका-यांकडून केले जात आहे. त्यामुळे समिती व वनविभाग यांच्यातील वाद समोर आला आहे.
माथेरानमधील फॉरेस्ट गार्डनच्या जागेवर इको गार्डन उभारण्यासाठी समिती आग्रही आहे. तसेच माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने त्याच्या अंमलबजावणीचीही गरज आहे. त्यासाठी समितीने कंबर कसली आहे. समितीचे अध्यक्ष गिरीश पवार व सदस्यांनी महाबळेश्वर गाठून तेथील इको सेन्सिटीव्ह झोनची माहिती घेतली. सोबतच वन विभागाच्या सल्ल्याने आणि संयुक्त वनव्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने बहुतेक सर्व पॉइंटवर महाबळेश्वरमध्ये सुशोभिकरण कामे केली आहे. त्यातून पर्यटकांना सर्वच पॉइंट्सचे दर्शन होते. महाबळेश्वरमध्ये स्वच्छता कर आकारला जातो. त्यातून चांगले उत्पन्न होते. या उत्पन्नातून विकासाची नवी कामे केली जातात. महाबळेश्वरमधील हा प्रकल्प माथेरानच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जाऊन पाहिला. या बाबत कागदपत्रे कशी तयार केली जावीत, कोणती पावले उचलावीत यांची माहिती घेतली. महाबळेश्वरमधील संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अन्ना बिरामने यांनी माथेरान समितीच्या सदस्यांना सर्व माहिती दिली.
स्वच्छता कराच्या माध्यमातून आलेल्या आर्थिक पाठबळातून आर्थर सीट पॉइंट परिसरातील ११ पॉइंट्सचे केलेले सुशोभिकरण दाखवण्यात आले. महाबळेश्वरची पाहणी करून आता माथेरान संयुक्त वनव्यवस्थापन समिती तसा प्रस्ताव माथेरान वनविभागाला सादर करणार आहे. त्यातून पर्यटन वाढेल आणि माथेरानच्या सौंदर्यातही भर पडेल. असा विश्वास समितीचे अध्यक्ष गिरीश पवार यांना आहे.