आयपीएल-८मध्ये रविवारी (१२ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर माजी विजेता मुंबई इंडियन्सची गाठ किंग्ज इलेवन पंजाबशी आहे.
मुंबई – आयपीएल-८मध्ये रविवारी (१२ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर माजी विजेता मुंबई इंडियन्सची गाठ किंग्ज इलेवन पंजाबशी आहे. दोन्ही संघांना सलामीला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे उभय संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.
सलामीला मुंबईला माजी विजेता कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत व्हावे लागले. पंजाबला शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने हरवले. घरच्या मैदानावर (होम ग्राऊंड) खेळणा-या मुंबईचे पारडे जड वाटते. मात्र मागील दोन मोसमात यजमानांना सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागलेय.
वानखेडेच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक ‘बाऊन्स’ मिळतो. तसेच चेंडू चांगलेच वळतात. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांचा कस लागेल. त्यातच सुरुवातीच्या सामन्यात उभय संघांची फलंदाजी ढेपाळल्याने फलंदाजांच्या चिंतेत भर पडली आहे.
कोलकात्याला केवळ मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा नडला. त्याला कोरी अँडरसनची चांगली साथ लाभली. मात्र अन्य सहकाऱ्यांसह गोलंदाजांनी निराशा केली. यजमानांना कामगिरी उंचवायची असेल तर आरोन फिंच, आदित्य तरे आणि अंबाती रायडूने फलंदाजीत चांगले योगदान देण्याची आवश्यकता आहे. तसेच वेगवान गोलंदाज लसित मलिंगासह ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि डावखुरा प्रग्यान ओझा या फिरकी दुकलीला सूर गवसणेही तितकेच आवश्यक आहे.
विश्वचषक विजेत्या संघातील वेगवान गोलंदाज जोश हॅझेलवुडच्या माघारीमुळे मुंबईला एका चांगल्या गोलंदाजाची उणीव भासतेय. मलिंगासह कीरॉन पोलार्डला सातत्याने संघात घेतले जात असल्याने अन्य परदेशी क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळत नाही.
मुंबईप्रमाणे पंजाबलाही सलामीला खराब फलंदाजीचा फटका बसला. सलामीवीर वीरेंदर सेहवाग, ग्लेन मॅक्सवेलने निराशा केल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांचे (राजस्थान) आव्हान अवघड होऊन बसले. अक्षर पटेलसह डेव्हिड मिलर आणि कर्णधार जॉर्ज बेलीने थोडी फटकेबाजी केली तरी आघाडीच्या फळीच्या अपयशातून संघ सावरला नाही.
मध्यमगती संदीप शर्मा आणि अनुरीत सिंगने अचूक आणि मारा केला तरी अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन, फिरकीपटू अक्षर पटेल आणि करणवीर सिंग महागडे ठरले. जेम्स फॉकनरने केलेली तिघांची धुलाई तसेच १२ वाईडसह २१ अवांतर धावांचा बोनस पाहता राजस्थान चांगले आव्हान उभे करता आले. मुंबईची चांगली फलंदाजी पाहता पंजाबच्या गोलंदाजांना नियंत्रित मारा करावा लागेल.
वेळ : रा. ८ वा.