आरोग्य विभागातील ५५ टक्के कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या बाबत वैद्यकीय अधिका-यांनी कर्मचा-यांची वेतनवाढ रोखून कारवाई सुरू केल्याने कर्मचारी आता प्रशासनावर दबाव आणत आहेत.
सिंधुनगरी- आरोग्य विभागातील ५५ टक्के कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या बाबत वैद्यकीय अधिका-यांनी कर्मचा-यांची वेतनवाढ रोखून कारवाई सुरू केल्याने कर्मचारी आता प्रशासनावर दबाव आणत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अडचणीत आला आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या नियंत्रणाखाली असणारे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माते आदी कर्मचा-यांना मुख्यालयात राहण्याबाबतची सक्ती करण्यात आली होती. आरोग्य समिती सभेत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीच हे कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याने आवाज उठवला होता. मुख्यालयात राहत नसलेल्या कर्मचा-यांची शोधमोहीम हाती घेऊन अशा कर्मचा-यांवर कारवाई करावी, असे आदेशही सभागृहात देण्यात आले. या आदेशानुसार आरोग्य विभागाने घेतलेल्या शोध मोहिमेत ५५ टक्के कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याचे उघड झाले.
पाच जूनपासून या कर्मचा-यांनी आपआपल्या मुख्यालयात राहावे, असे आदेशही आरोग्य विभागाने दिले होते. प्रामुख्याने सावंतवाडी, कुडाळ, कणकवली या तालुक्यातील बहुतांशी आरोग्य कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याचे उघडकीस आले आहे. वैद्यकीय अधिका-यांकडून त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असल्याने आतापर्यंत आदेश धुडकावणा-या या कर्मचा-यांवर सभागृह काय निर्णय घेते, याकडे प्रशासन व मुख्यालयात राहणा-या कर्मचा-यांचे लक्ष लागले आहेत.
आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण अभियान योजनेंतर्गत १७ वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्तीस मंजुरी मिळाली. त्यातील १० पदे भरण्यात आली. उर्वरित सातही पदांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी ७ वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती केल्याने आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार आहे.