बार्सिलोना स्टार लिओनेल मेसीवर किती अवलंबून आहे हे स्पॅनिश ला-लिगा हंगामाच्या सुरुवातीलाच दिसले.
बार्सिलोना- बार्सिलोना स्टार लिओनेल मेसीवर किती अवलंबून आहे हे स्पॅनिश ला-लिगा हंगामाच्या सुरुवातीलाच दिसले. मेसीच्या दोन गोलांमुळे बार्सिलोनाला रविवारी ला-लिगामध्ये इल्चेला ३-० नमवता आले. याबरोबरच हंगामाची सुरुवात बार्सिलोनाला विजयाने करता आली. नवीन प्रशिक्षक लुइस एन्रिके यांचीही ला-लिगा हंगामाची चांगली सुरुवात झाली. ४४व्या मिनिटापासूनच १० जणांसह खेळण्याची वेळ येऊनही यजमानांनी प्रभावी कामगिरी केली.
मेसीने ४२व्या आणि ६३व्या मिनिटाला गोल नोंदवले. दुखापतग्रस्त स्टार नेयमारच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला १८ वर्षीय मुनिर अल हदादीने ४६व्या मिनिटाला बार्सिलोनासाठी एक गोल केला. त्यातच पहिले सत्र संपायला एक मिनिट बाकी असताना जेवियर माश्चेरानोला लाल कार्ड दाखवून रेफ्रींनी बाहेर काढले. इल्चेच्या गॅरी रॉड्रिगेझला पायात पाय घालून पाडल्याने माश्चेरानोला लाल कार्ड दाखवण्यात आले. मात्र १० जणांसह बार्सिलोना खेळत असूनही इल्चेला गोल करण्यासाठी फायदा घेता आला नाही. चार बचावपटूंसह मेसीला वेढा घालण्याचे इल्चेचे प्रयत्न फोल ठरले.
अपयश अजूनही आठवतेय..
मेसीला गेल्या हंगामातील अपयश अजूनही आठवत असल्याचे त्याच्या फेसबुक पेजवरून दिसले. ‘‘आज (रविवारी) आमची पहिली लढत आहे. नवीन हंगामात देव आम्हाला यश देईल अशी इच्छा आहे,’’ असे मेसीने फेसबुकवर लिहिले. गेल्या हंगामात बार्सिलोनाने गमावलेले ला-लिगा जेतेपद, चॅँपियन्स लीग जेतेपद आणि त्यापाठोपाठ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत अर्जेटिनाला स्वीकारावा लागलेला पराभव मेसी अजूनही विसरलेला नाही.