आयपीएलचे निलंबित अध्यक्ष ललित मोदी यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केल्याप्रकऱणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अडचणीत सापडल्या आहेत.
नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सर्वात मोठा घोटाळा केल्याप्रकरणी ठपका असलेला ‘आयपीएल’चा माजी अध्यक्ष ललित मोदी याला व्हिसासाठी मदत करणा-या केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.
मोदीला लंडनमधून बाहेर पडण्यासाठी स्वराज यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचे वजन वापरल्याचे उघड झाले आहे. स्वराज यांना या प्रकरणात अपक्षांसह काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी चांगलेच घेरले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा सरकारने सुषमा स्वराज यांना पाठिंबा दर्शवला असून, स्वराज यांनी केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून मोदी यांना मदत केल्याची सारवासारव सुरू केली आहे.
दरम्यान, स्वराज यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.
विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी अद्याप मौन धारण केले आहे. मात्र या प्रकरणी स्वराज यांची विकेट निश्चित असल्याचे संकेत दिल्लीतून मिळत आहेत.
मोदी यांच्या पत्नीला कर्करोग झाल्याने त्यांची ४ ऑगस्ट रोजी पोर्तुगालला शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. त्यासाठी रुग्णालयातील कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी तेथे हजर राहणे गरजेचे असल्याचे मोदी यांना जुलै २०१४ मध्ये मला सांगितले होते, असे स्वराज यांचे म्हणणे आहे. यासाठी मोदी यांना प्रवासाची कागदपत्रे देण्यास हरकत नाही, असे स्वराज यांनी ब्रिटनला कळवले होते.
केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून मोदी यांना ही मदत केल्याचा खुलासा स्वराज यांनी केला आहे. २०१३ मध्ये लोकसभेत नेतेपदी असताना सुषमा स्वराज यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या ब्रिटनमधील प्रवेशासाठी ललित मोदीची मदत घेतली होती. त्या बदल्यात स्वराज यांनी ललित मोदीची मदत केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.
सक्त वसुली संचलनालय (ईडी) चा मोस्ट वाँटेड आरोपी असलेल्या ललित मोदी याला ब्रिटनमधून बाहेर पडण्यासाठी स्वराज यांनी ‘ट्रॅव्हल्स व्हिसा’ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे एका वृत्तवाहिनीने उघड केले आहे. इतकेच नाहीतर स्वराज यांनी ललित मोदीला केलेल्या मदतीसंदर्भात सरकार अंधारात असल्याचे म्हटले आहे.
भारतीय वंशाचे ब्रिटनमधील खासदार किथ वाझ हे देखील या प्रकरणात अडचणीत आले असून त्यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वाझ यांनी स्वराज यांचे नातलग ज्योर्तिमय कौशल यांनाही ब्रिटिश लॉ डिग्री कोर्ससाठी मदत केल्याचेही ब्रिटनधील
प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी
‘आयपीएल’चा प्रमुख घोटाळेबाज ललित मोदी याला मदत केल्याप्रकरणी काँग्रेसने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी रविवारी लावून धरली. भ्रष्टाचारविरोधात नेहमीच नैतिकतेच्या गप्पा मारणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिकाही या प्रकरणात संशयास्पद असल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांनाही लक्ष्य केले आहे. लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विविध अकरा प्रश्न उपस्थित केले आहेत. यात भ्रष्टाचारविरोधी भाजपाची पारदर्शकता आता कुठे गेली? काळा पैसा भारतात आणण्याच्या बाता करणा-या मोदी सरकारने हवाला प्रकरणात सुमारे ७०० कोटींचा घोटाळा करणा-या आरोपीला पाठीशी घालणे कितपत योग्य आहे? जनता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करत आहे, असे सांगत नवी दिल्ली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. मानवतेच्या दृष्टिकोनातून ललित मोदी याला मदत केल्याचा सुषमा स्वराज यांचा खुलासाही काँग्रेसने खोडून काढला आहे.