रोजच्या कामाच्या धावपळीत सण- उत्सव आले की कामात आणखीनच भर पडते. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळी येऊन ठेवली?आहे. दिवाळीच्या स्वागतासाठी काना-कोपरा स्वच्छ केला जातो. सगळंचं कसं झाडून-पुसून करावं लागतं. कुठून सुरुवात करायची हा प्रश्न असतो. त्यात कमी वेळात झटपट साफसफाई करायची म्हणजे एखादी मोहीम हातात घेतल्यासारखं आहे.
अवघ्या दोन दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. फराळ, स्वच्छता केव्हढी कामं पडली असतील. एव्हाना दिवसांचं प्लानिंग सुरू झालं असेलच. साफसफाईला कुठून सुरुवात करायची असं झालं असेल. कारण दिवाळीची साफसफाई करणं म्हणजे घरातील कपडे भांडीकुंडी सर्व काही धुऊन पूसून चकाचक करण्यामधे गृहिणींची तारांबळ उडते. मदतीला घरातील पुरुष आणि छोटी मंडळी असतातच पण महिलांना यांनी केलेलं कामसुद्धा पटत नाही. स्टुलावर चढून करण्याची काम किंवा जड वस्तू बाहेर काढण्याचं आणि उचलण्याचं काम पुरुषमंडळींनाच करावं लागतं. कोणाची कितीही मदत असली तरीही नोकरी करून हा वेगळा उपद्व्याप करणं थोडं कठीणचं असतं. मोकरी करणा-यांचच कशाला गृहिणी असणा-यांनाही फराळ करून ही काम करणं अशक्यचं होतं. त्यात रंगरंगोटी करायची असेल तर जीव मेटाकुटीला येतो. पण परंपरेप्रमाणे ही काम करावीच लागतात. मग दिवाळीची ही साफसफाई कशी करावी याची ही थोडक्यात माहिती.
दिवाळीची साफसफाई करण्याअगोदर घरातली अडगळ काढून टाका. नको असलेली, पण वर्षानुवर्ष तशीच पडून असलेली भांडी-कुंडी काढून टाका. याचा अर्थ असा नाही की अडगळीच्या खोलीत किंवा इतर ठिकाणी त्याचा साठा करून ठेवा. जी वस्तू टाकायची आहे ती सरळ भंगाराला किंवा कोणा गरीब-गरजू व्यक्तीला देऊन टाका.
घरातली अडचण काढून टाकण्याचं काम आधीच करा म्हणजे साफसफाई सहज करता येईल.
घरात झुरळ, पाली किंवा अन्य किटकांचा वावर असेल तर पेस्ट कंट्रोलचं काम आधीच करून घ्या. म्हणजे साफसफाईचं काम पुन्हा करायला नको. पेस्ट कंट्रोलचं काम करणा-या माणसांना बोलावलं की तुमचं काम सहज होऊ शकेल.
काही प्ल्मबिंगचं काम असेल तर तेही करून घ्यावं. म्हणजे पाण्याच्या टाक्या अस्वच्छ असतील तर त्याही स्वच्छ करून घ्याव्यात. कुठे खिळे ठोकायचे असतील तर तेही त्यावेळीच करून घ्यावं. कारण या सगळ्या कामांना वेळही लागतो तसंच घरात कचरासुद्धा होतो.
अडगळ काढून टाकली की काम तसं सोपं होतं. बरंचसं सामान कमी होतं. त्यानंतर घरातल्या मौल्यवान वस्तूंवर चादर किंवा एखादं कापड टाकून घरातली जळमटं, धूळ झाडून टाका. धूळ काढल्याने घरातला प्रत्येक कोपरा उजळेल. ही धूळ काढताना लांब झाडूचा किंवा टेबलचा वापर करावा जेणेकरून अगदी उंचावर असलेली धूळही निघून जाईल. तसंच सोफा, गाद्या किंवा बेड यावरची धूळ काढण्यासाठी व्हॅक्युम क्लिनरचा वापर करावा. व्हॅक्युम क्लिनर नसेल तर एक-दोन दिवस गादी कडक ऊन्हात ठेवावी.
घर चांगलं झाडून झालं की, वस्तू पुन्हा जागच्या जागी ठेवण्याअगोदर सगळ्या वस्तू पुसून घ्याव्यात. शोभेच्या वस्तूंपासून ते मौल्यवान वस्तूंपर्यंत सगळं पुसून स्वच्छ करा.
कित्येक ठिकाणी लादी पुसण्याऐवजी धुतली जाते. मात्र लाकडाचं फर्निचर असेल तर ते पाणी लागून खराब होण्याची शक्यता असते. म्हणून लादी स्वच्छ पुसून घ्या. स्वयंपाकघरात ओटय़ाच्या लगत असलेल्या टाइल्स स्वच्छ करण्यासाठी चांगल्या साबणाचा वापर करा. जेणेकरून टाइल्स स्वच्छ होतील.
खिडक्या-दरवाजेसुद्धा स्वच्छ करून घ्या. आजकाल प्रत्येकाकडे स्लायडिंग विंडो असतात. त्यामुळे त्याच्या खाचा स्वच्छ करण्यासाठी जुन्या ब्रशचा किंवा काथ्याचा वापर करावा. जेणेकरून खाचांमध्ये अडकलेली धूळ, माती काढणं सोपं होईल. ग्रीलचा दरवाजा असेल तर तोही झाडून-पुसून स्वच्छ करावा.
घरातले बल्ब, लाइट, पंखे यांची साफसफाई करणं सर्वात महत्त्वाचं असतं.
सगळी स्वच्छता झाल्यानंतर किचनमधले डबे रिकामी करून घासून-पुसून स्वच्छ करावेत. काचेच्या भांडय़ांची विशेष काळजी घ्यावी. भांडी घासून पुसून झाल्यावर ती लगेच कपाटात ठेवावीत नाही तर दिवाळी येण्याअगोदरचं त्यावर पुन्हा धूळ दिसेल. ज्यांना अगदीच घासायला जमत नसेल त्यांनी डबे ओल्या कापडाने पुसून घ्या.
घरातली कपाटंसुद्धा झाडून-पुसून झाल्यावर त्या कपाटांमध्ये डांबराच्या गोळ्या टाकून ठेवाव्यात. जेणेकरून झूरळ वगैरे होणार नाहीत. सगळे कपडे आणि इतर वस्तूंची व्यवस्थित मांडणी करावी.
घरातल्या साफसफाईप्रमाणे घराबाहेरची साफसफाईसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे अंगण किंवा मोकळी जागा असेल तर त्याचीसुद्धा स्वच्छता करून घ्या.
छोटी बाग असेल तर बागेतल्या झाडांची माती बदलणं किंवा कुंडय़ा बदलण्याची काम आधीच करून घ्यावीत. कुंडय़ांचा रंग उडाला असेल तर त्या रंगवून घ्या.
घरातल्या चादरी, उशीचे कव्हर, पडदे अशा वस्तूसुद्धा चांगल्या धुऊन ठेवाव्यात.
तुम्हाला घराचा लुक बदलायचा असेल तर घराची रचना बदलून पाहा. सोफा, कपाट यांची जागा बदलून पाहा जेणेकरून थोडं प्रसन्न वातावरण निर्माण होईल.
सगळं धुऊन पुसून झाल्यानंतर घरात सुगंधीत वास दरवळेल अशा वस्तू आणून ठेवा.
घरातल्या सजावटीत भर घालणा-या वस्तूंची खरेदी करा. एखादा फ्लॉवरपॉट आणि त्यात आकर्षक फुलं, किंवा एखादं वॉलपीस घरातल्या भिंतीवर लावावं. म्हणजे घराला वेगळ लुक तर येईलच तसंच स्वच्छ केलेलं घर प्रसन्न दिसेल.
साफसफाई झाल्यानंतर घरात पसारा होणार नाही आणि घर स्वच्छ राहिल याची विशेष काळजी घ्या.