ढोल-ताशाच्या गजरात अर्जदारांची उत्कंठा शिगेला पोचवत भव्य स्वरुपात सोडत प्रक्रीया वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली.
मुंबई- डॉल्बी म्युझिकच्या तालावर व्यासपीठावरील भव्य पडद्यावर फिरत्या कॅसिनो व्हीलचे अॅनिमेशन आणि मग टेन..नाईट.एट.टू वन झीरो..असा काऊंटडाऊन करत फटाक्यांच्या डिजीटल आवाजात पडद्यावर म्हाडाच्या यंदाच्या सोडतीतील विजेत्यांची नावे झळकली. ढोल-ताशाच्या गजरात सभागृहात उपस्थित असलेल्या अर्जदारांची उत्कंठा शिगेला पोचवत भव्य स्वरुपात सोडत प्रक्रीया रविवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. घरासाठी वर्षानुवर्षे अर्ज करणा-या अनेक अर्जदारांच्या पदरात यंदाही निराशाच पडली. तर काही भाग्यवंतांना पहिल्यांदाच अर्ज भरुन त्यांना घर लागल्याने त्यांचा आनंदाला पारावार उरला नाही. १ लाख २५ हजार ८४४ अर्जदारांपैकी १०६३ अर्जदारांची गृहस्वप्नपूर्ती झाली.
म्हाडाचे घर लागणार की नाही अशी हुरहुर मनाशी बाळगणा-या अर्जदारांची लांबलचक रांग रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून लागली होती. सभागृहाच्या बाहेरही मंडपात एलसीडी लावले होते. या स्क्रीनवर सोडतीचे थेट प्रक्षेपण केले जात होते. म्हाडाद्वारे मुंबईतील ९९७ आणि अंध-अपंग प्रवर्गासाठी राखीव असणा-या ६६ घरांची संगणकीय सोडत रविवारी पार पडली. या प्रसंगी म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुधीर खानापुरे, सहमुख्य अधिकारी चंद्रकांत डांगे, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने, माजी लोकायुक्त सुरेश कुमार अन्य म्हाडा अधिकारी उपस्थित होते. सकाळी १० वाजल्यापासून सोडत प्रक्रीयेला सुरुवात झाली. यावेळी विजेत्या आणि प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. या निकालाची यादी सोडतीच्या संकेतस्थळावर रविवारी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली. सभागृहात उपस्थित असलेल्या विजेत्यांचा यावेळी व्यासपीठावर बोलावून पुष्पगुच्छ आणि म्हाडाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तंत्रज्ञानाची किमया
म्हाडाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मेहनतीमुळे यंदाची सोडत प्रक्रीया सुरळीत आणि पारदर्शकरित्या पार पडली. विशेष म्हणजे गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही सोडतीच्या थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती. यासाठी विशष्ट लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली. देशासह परदेशातूनही तब्बल ४० हजारहून अधिक जणांनी सोडत प्रक्रिया थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिल्याची नोंद केली गेली.