१९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली.
नवी दिल्ली – मुंबईला हादरवून सोडणा-या १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २१ मे रोजी याकूब मेमनचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. राष्ट्रपतींच्या या निर्णयाला मेमनने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका घटनापीठाकडे पाठवली आहे. मेमनने आपल्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अन्य प्रकरणात दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलल्याचा दाखला दिला आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने ज्या शिफारशी केल्या होत्या त्या आधारावर राष्ट्रपतींनी याकूब मेमनची दयेचा अर्ज फेटाळून लावला होता.
मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांसाठी कट रचणे, पैशाची व्यवस्था करणे आणि सह आरोपींच्या मदतीने कटाची अंमलबजावणी करणे या आरोपांखाली टाडा न्यायालयाने २००७ मध्ये याकूब आणि त्याचा भाऊ टायगर मेमनला दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. टायगर मेमन या कटाचा मुख्य सूत्रधार होता.
ऑक्टोंबर २०१३ मध्ये याकूब मेमनने राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला. १९९४ मध्ये काठमांडू विमानतळावरुन याकूब मेमनला अटक करण्यात आली होती. मुंबईत १९९३ साली घडवून आणलेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत २५७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते तर, ७१३ जण जखमी झाले होते.