बुद्धांचा योग पतंजलीने लांबवला. पुढच्या योग दिनाला डॉ. हेडगेवार आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लागले तर नवल नाही. पतंजली आणि नरेंद्र मोदी यांना योगाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय तर जरुर देता येईल;
बुद्धांचा योग पतंजलीने लांबवला. पुढच्या योग दिनाला डॉ. हेडगेवार आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लागले तर नवल नाही. पतंजली आणि नरेंद्र मोदी यांना योगाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय तर जरुर देता येईल; पण डॉ. हेडगेवारांचा योगाशी संबंध काय? योगापेक्षा विविधतेने भरलेल्या भारतीय संस्कृतीला एकाच साच्यात ओतण्याचा प्रयास आहे.
तदा द्रष्टु: स्वरुपेवस्थानम्।।
स्वत:वर, स्वत:च्या चित्तावर ताबा मिळवण्यासाठी योगाचा हेतू आहे, असे पतंजली सूत्र सांगते. २१ जूनला जागतिक योग डे साजरा करायला लावणारे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यामागचा हेतू काय आहे? त्यांची ५६ इंच छाती आणि ५६ इंच जुबान एव्हाना अवघ्या देशाला आणि जगालाही माहीत झाली आहे.
बाजारात मोठय़ा आवाजात जो विकतो त्याचाच माल विकला जातो. ‘यूपीए’च्या अनेक योजना मोदींनी त्यांचे लेबल लावून या आधीच विकून टाकल्या आहेत. आता प्राचीन योगशास्त्रावर योगी नरेंद्रचार्याचे लेबल लागले तर नवल नाही.
भारतीय परंपरा आणि भारतीय मानसिकता यांची नाडी त्यांना पक्की कळली आहे. त्यात त्यांचा हात धरणारा दुसरा राजकीय नेता नाही. भारतीय अध्यात्मात दर्शनाचा दर्जा मिळालेल्या योगशास्त्राचा अचूक वापर मोदींनी केला तर त्यावर आक्षेप घेण्याचेही कारण नाही.
शरीर आणि मनाच्या स्वास्थासाठी या प्राचीन व्यायामशास्त्राला ते जागतिक मान्यता मिळवून देत असतील तर त्यावरही हरकत घेण्याचे कारण नाही. भारतीय संस्कृतीच्या एका देणगीला जागतिक मान्यता मिळत असेल तर त्याबद्दल अभिमान बाळगायला हवा. ती मिळवून देण्याचे काम पंतप्रधान करत असतील तर तेही तितकेच अभिनंदनाला पात्र आहेत; परंतु मोदी आणि संघ, भाजपा परिवाराचा हेतू तितका निर्भेळ आणि निर्मळ आहे काय? अन्यथा २१ जूनची तारीख त्यांनी निवडली नसती.
योगशास्त्राचे कर्ते ऋषी पतंजली मानले जातात. योगाचा शोध त्यांनी लावला काय? योगशास्त्र त्या आधीही होते. पतंजलींनी ते सर्वप्रथम सूत्रबद्ध पद्धतीने मांडलं. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यना आणि ध्यान धारणेचाच योग हा विकसित भाग मानला जातो. योग, विपश्यना आणि ध्यानधारणा ही वैदिक की अवैदिक असा वाद होऊ शकतो; परंतु उपलब्ध पुरावे हे प्रकार अवैदिक असल्याचेच जास्त सांगतात.
वैदिकांपेक्षा श्रमण संस्कृतीशी त्यांचे अधिक नाते आहे. धर्माचा त्यात काही संबंध नाही आणि अगदी देवाशीही संबंध नाही. खुद्द पतंजली सूत्रात ईश्वराचा एकदाच उल्लेख येतो.
शंकराचार्यापासून सुरू झालेल्या हिंदू धर्म परंपरेशीही त्याचे नाते नाही. वैदिकांचे हत्यार यज्ञ होता. अवैदिक श्रमण योग, विपश्यना आणि ध्यानाच्या मार्गाने आत्मशोधनाचा प्रयत्न करत होते. बुद्ध आणि महावीरांच्या वाटेवरून चालणा-यांची ही साधने होती. तथागतांनी अष्टांगिक मार्ग सांगितला. अष्टांगिक योग हे त्याचेच संकरित रूप आहे. सांख्य योग ही भारतीय दर्शनातली जोडी आहे. सांख्यदर्शन कपिल मुनींचे. ते पूर्णपणे निरीश्वरवादी तर योग ईश्वरवादी. कपिल मुनी हा प्रल्हादाचा मुलगा तर बळीराजाचा काका. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बळीवंश आणि अन्य संशोधनात ते कधीच सिद्ध केले आहे.
वैदिकांच्या विजयांनंतर अवैदिकांची अनेक शास्त्रे आणि परंपरा त्यांनी लांबवल्या आणि वैदिक शेंदूर फासून पुनस्र्थापित केल्या. ज्या पतंजलींचे योगशास्त्र आज उपलब्ध आहे, तेच मूळात इ. स. पूर्व दुस-या शतकातले आहे. सम्राट अशोकाचा खापर पणतू सम्राट बृहद्रथाचा खून त्याचा सेनापती पुष्यमित्र शुंगाने कपटाने केला आणि वैदिक धर्माची स्थापना केली. वैदिकीकरणाच्या त्या कामात पतंजलीची मदत झाली.
योगशास्त्राच्या वैदिकीकरणाची सुरुवात तेव्हापासूनची आहे. चार्वाक पंथीय आर्य चाणक्याचे अर्थशास्त्र चंद्रगुप्तापासून बृहद्रथापर्यंत मौर्य राजवटीचे संविधान म्हणून काम करत होते. पुष्यमित्र शुंगाच्या काळातच अर्थशास्त्र रद्द करून मनुस्मृतीची रचना झाली. म्हणून संघ परिवाराला त्याबद्दल विशेष आस्था आहे. पुढे आर्य चाणक्यालाच लांबवण्यात वैदिकांना आणि संघ परिवाराला यश आले. आता योगावर पतंजलीनंतर मोदींचे लेबल लागत आहे.
विदेशातही योग खूप लोकप्रिय आहे; पण तो धर्माचा किंवा ईश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणून नव्हे. अनेक भारतीय, अभारतीय प्रचारकांनी योगाचे फ्यूजन जगभर नेले. शरीर आणि मनाच्या स्वास्थासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून तर तो लोकप्रिय आहे; पण भारतीय मनात योगाच्या गूढ सिद्धीबद्दल अधिक कुतूहल अन् आकर्षण आहे. त्यामुळे योगशास्त्रात प्रवीण असणा-यांना ते सिद्ध पुरुष मानतात.
जगभर योगाच्या उपयुक्ततेबद्दल असलेली मान्यता हेरून नरेंद्र मोदी यांनी ‘युनायटेड नेशन’ची मान्यता मिळवली. योगाला कमोडिटी बनवू नका, असे योगपथावर मोदींनी आवाहन केले खरे; पण रामदेव बाबांपासून श्री श्री रविशंकरांपर्यंत योगाची कमोडिटी कधीच बनली आहे. मोदींमधल्या हुशार व्यापाऱ्याला बाजार कळतो. कमोडिटी बनवू नका, हे आवाहन ते करत होते, तेव्हा भारतीय मनात रुजलेल्या योग सिद्धीच्या आध्यात्मिक गूढ आकर्षणालाच ते हाक मारत होते.
म्हणून योगाबद्दल वेगळी भाषा बोलणारे वेगळे पडत होते. ‘लव्ह जिहाद’पासून ‘घर वापसी’पर्यंतच्या वादावर सोयीस्कर मौन धारण करणारे संघ परिवाराचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी योगपथावरून कुठला राजपथ आक्रमत आहेत, हे सांगण्याची गरज आहे काय? २१ जूनचा दिवस सर्वात मोठा असतो म्हणून योग दिनाची निवड झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि राजकीय हिंदुत्वाचे संवर्धक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतिदिन आहे २१ जून.
आपल्या आद्य गुरूच्या ७५व्या स्मृतिदिनाला एवढी मोठी गुरुदक्षिणा देणारा दुसरा संघ स्वयंसेवक झाला नसेल. पतंजली आणि नरेंद्र मोदी यांचे श्रेय नाकारण्याचे कारण नाही. वैदिक, अवैदिकांचा संघर्ष आजच्या योगपथावर आणण्याचेही कारण नाही. भारतीय संस्कृती संघर्ष आणि संकरातूनच विकसित झाली आहे. योग हाही एक सांझी विरासत आहे. सामायिक वारसा आहे. आचार्य पतंजली हे बहुपेडी व्यक्तिमत्त्व होते.
आयुर्वेदाच्या चरक संहितेचे संस्करण त्यांनीच केले. पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य रचले. राजयोगाचे ते प्रवर्तक नाहीत; परंतु योगदर्शन या अधिकारी ग्रंथामुळे जणू तेच योगाचे प्रणेते बनले; पण म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही. ते सव्यसाची संपादक होते. उत्तम निरुपणकार होते. व्यासंगी भाष्यकार होते. त्यांनी योगाने चित्ताचा, व्याकरणाने भाषेचा आणि वैद्यकाने शरीराचा मळ दूर केला. म्हणून त्यांना अकराव्या शतकातल्या भर्तृहरीने अभिवादन केले आहे.
योगाने शरीराबरोबर चित्तशुद्धी अपेक्षित असते. अंहिसेच्या स्वीकाराबरोबर वैरभावाच्या त्यागाची शर्थ असते. या तिघांशी ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या मनात केवळ वैर आणि द्वेषाचा यज्ञ सतत जळतो आहे, त्यांनी योग दिनावर काय मुक्ताफळे उधळली? योगाची सक्ती मान्य नाही, त्यांनी देशाबाहेर चालते व्हावे, असे म्हणणारे सत्ताधारी पक्षातले खासदार आहेत.
शास्त्रीय योग प्रकारांना धर्मश्रद्धेचा शेंदूर आणि राख फासून वैराग्याची भाषा करणाऱ्या या मंडळींचे वर्णन ३०० वर्षापूर्वीच तुकोबारायांनी केले आहे-
ऐसे कैसे जाले भोंदू।
कर्म करोनि म्हणति साधु॥
अंगी लावुनियां राख।
डोळे झांकुनी करिती पाप॥
तुका म्हणे सांगों किती।
जळो तयांची संगती॥
योगाच्या मागची संगती डोळे झाक करून कशी चालेल? साक्षी महाराज, योगी आदित्यनाथांपासून राम माधवांपर्यंत यांची वक्तव्ये काय सांगतात? उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना बोलवायचे नाही आणि आले नाहीत म्हणून राळ उठवून द्यायची. हा उद्योग कशासाठी? सूर्यनमस्काराला नकार देणा-यांना समुद्रात बुडवून टाकण्याची भाषा का केली जाते? सूर्यनमस्कार आणि योगाचा संबंध काय? योगाला धर्माचा रंग देण्याचे कारण काय? योगाच्या निमित्ताने हिंदू-मुसलमान भेद करण्याचे कारण काय होते? या प्रश्नाची उत्तरे शोधली की, या योगा मागचा छुपा योग स्पष्ट दिसेल.
बुद्धांचा योग पतंजलीने लांबवला. पुढच्या योगदिनाला डॉ. हेडगेवार आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लागले तर नवल नाही. पतंजली आणि नरेंद्र मोदी यांना योगाला मान्यता मिळवून देण्याचे श्रेय तर जरुर देता येईल; पण डॉ. हेडगेवारांचा योगाशी संबंध काय? योगापेक्षा विविधतेने भरलेल्या भारतीय संस्कृतीला एकाच साच्यात ओतण्याचा प्रयास आहे. २१ जूनचा घाट त्यासाठीच होता.