रेट कॉन्ट्रॅक्टद्वारे झालेल्या गेल्या दहा वर्षातील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा अर्थमंत्री तथा मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या अनुपस्थितीतील प्रवक्ते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुंबई- रेट कॉन्ट्रॅक्टद्वारे झालेल्या गेल्या दहा वर्षातील खरेदीची चौकशी करण्याची घोषणा अर्थमंत्री तथा मुख्यमंत्र्यांचे त्यांच्या अनुपस्थितीतील प्रवक्ते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वरकरणी त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील लोकांना अडचणीत आणण्यासाठी ही घोषणा केल्याचे भासवत येत असले तरी प्रत्यक्षात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याची यामागे चाल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. यानिमित्ताने भाजपामधील अंतर्गत संघर्ष आणखी चव्हाटय़ावर येण्याची शक्यता आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने रेट कॉन्ट्रॅक्टद्वारे केलेले २०६ कोटींचे खरेदी प्रकरण चांगलेच गाजत आहे. या निमित्ताने महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका झाली. त्या परदेशात असतानाच हे प्रकरण उकरून काढण्यात आले. या खरेदीच्या चौकशीची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.
मात्र त्यावेळी कोणताही गजावाजा झाला नाही. मात्र पंकजा मुंडे परदेशात असताना या प्रकरणाची सर्व कागदपत्रे व्यवस्थित प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात आली. विरोधी पक्षांनी मागणी केली तेव्हा कुणी दखल घेतली नाही. मग आताच हे प्रकरण का पेटले आहे, असा प्रश्न मुंडे समर्थकांना पडला होता.
जे काम विरोधी पक्षातील लोकांना करता आले नाही, ते काम पक्षांतर्गत विरोधकांनी केले असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्याला दुजोरा मिळणा-या घटनाही एकामागून एक घडत आहेत.
चिक्की खरेदीचे प्रकरण थंड होते न होते तोच शालेय शिक्षण विभागाचा ९१ कोटींचा अग्निशमन यंत्र खरेदी घोटाळा समोर आला. या प्रस्तावात काळे-बेरे आढळल्याने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव अडवला. त्यामुळे ती खरेदी होऊ शकली नाही. परंतु हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे चांगलेच अडचणीत आले. त्यांनी दुस-याच दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन खुलासाही केला.
मात्र त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे समाधान होत नाही, असे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी असणारे सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन विनोद तावडे यांची पाठराखण केली. मात्र दुस-याच दिवशी अमेरिकेतून परतलेल्या पंकजा मुंडे यांची सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद होती तेव्हा एकाही मंत्र्याने पंकजा यांची पाठराखण केली नाही.
पंकजा यांनीही आपल्या पाठीशी राहणा-या मित्र पक्षांचे आभार मानले मात्र पक्षातल्या एकाचाही साधा उल्लेख केला नाही. ही बाब मुंडे विरोधकांच्या जिव्हारी झोंबली होती. म्हणूनच आता पुन्हा पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठीच गेल्या दहा वर्षातील रेट कॉन्ट्रॅक्ट खरेदीची चौकशी करण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. या चौकशीत किती खरेदीची ऑर्डर दिली? तेवढे उपलब्ध झाली का? त्याची गुणवत्ता योग्य होती का? आदींची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
खरे तर गेल्या वर्षी किंवा यापूर्वी दहा वर्षात खरेदी केलेली चिक्की त्या भागात पोहचली की नाही, हे आता कसे तपासता येईल, त्याची गुणवत्ता कशी पाहता येईल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हणूनच चौकशी मागील दहा वर्षाच्या खरेदीची असली तरी प्रत्यक्षात या वर्षाच्या खरेदीतील खरे-खोटेपणा तपासण्यात येणार आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा पक्षांतर्गत विरोधकांचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.