रत्नागिरीजवळ एसटी बसला सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले.
रत्नागिरी- रत्नागिरी शहर बसस्थानकातून वायंगणी ही फेरी घेऊन रत्नागिरीच्या दिशेने निघालेल्या एसटीचा सकाळी ९.४५ वाजता वायंगणी फाटय़ापासून अवघ्या दीड कि. मी. अंतरावर असताना एस टी चा स्टिअरिंग रॉड तुटल्याने अपघात झाला. स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालक सोमनाथ जगन्नाथ मुरकुटे यांचा बसवरील ताबा सुटला. स्टिअरिंग रॉड तुटल्यानंतर बस शेताच्या बांधावर आदळल्यानंतर दरवाजाच्या बाजुने उलटली. या अपघातात ३ जण जबर जखमी झाले.
बसखाली सापडलेल्या प्रवाशांना स्थानिक ग्रामस्थांनी मोठय़ा शर्थीने बसमधून बाहेर काढले.
या अपघातामध्ये प्रभाकर गोपाळ घाणेकर (५०, रा. वायंगणी) यांचा डाव पाय एसटी खाली सापडल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय संतोष तुकाराम उबारे (२०) आणि केदार विश्वनाथ उबारे (१८, दोघेही रा. वायंगणी) यांच्या हाताला व पायाला जबर दुखापत झाल्याने या दोघांनाही जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचाराकरिता खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
बसमध्ये शहरात शाळेत येणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर होती. याशिवाय शहरात भाजी विक्रीकरीता येणा-या महिलाही या बसमध्ये होत्या. बसमध्ये सुमारे ७० प्रवासी असल्याची माहिती एसटीच्या अधिका-यांनी दिली. अपघातानंतर काही वेळात वायंगणीतील ग्रामस्थ अपघात झालेल्या ठिकाणी दाखल झाले. ग्रामस्थांनी एसटीत अडकलेल्या प्रवाशांची ब-याच प्रयत्नांनी सुटका केली.
या अपघातामध्ये संतोष उबारे (२०), केदार उबारे (११), रितीशा भुवड (१५), वैदही बिडू (११), वेदांत पावसकर (११), तेजल लिंगायत (१५), नेहा बिडू (१९), संगीता शेलार (३०), ओंकार पावसकर (१२), रेखा पावसकर (२०), आदेश राडय़े (१०), ओंकार घवाळी (१४), यश लिंगायत (११), मुग्धा सालम (१३) वैष्णवी शेडगे (१२), विक्रांत शेलार (१०), श्रीरंग घवाळी (१०), श्रुतिका खाडे (१३), विराज भुवड (१२), प्रणाली खडसोरे (२५), आकांक्षा शेलार, साहील भुवड, निरंजन घवाळी, आणि सारीका भाताडे (१५) हे किरकोळ जखमी झाले आहेत. उपचारानंतर यातील काहींना तात्काळ सोडून देण्यात आले. तर काही जखमींना अधिक उपचाराकरीता खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
जखमींना एसटीकडून तात्काळ मदत
अपघातामध्ये जखमी झालेल्या जखमींना एसटी प्रशासनाकडून तात्काळ मदतनिधीचे वाटप करण्यात आले. जखमींना तीनशे, पाचशे आणि हजार रुपयांपर्यंतची मदत तातडीने जिल्हा रुग्णालयातच देण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाकडून करण्यात आली होती. याशिवाय पुढील उपचाराकरिता खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेल्या रुग्णांच्या खर्चाची जबाबदारीदेखील एसटी प्रशासनाकडून उचलण्यात आली.