आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदींना मदत केल्याप्रकरणावरून वादात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – आयपीएलचे निलंबित आयुक्त ललित मोदींना मदत केल्याप्रकरणावरून वादात अडकलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
वसुंधरा राजे यांनी २००७ मध्ये पद्म पुरस्कारासाठी ललित मोदी यांच्या नावाची शिफारस केली होती अशी माहिती समोर आली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,२८ जुलै २००७ मध्ये राजस्थान क्रीडा परिषदेने पद्म पुरस्कारासाठी मोदींचे नाव सुचवले होते. यावेळी राजे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होत्या. या नव्या खुलासामुळे भाजपा पुन्हा एकदा चांगलाच कोंडीत सापडला आहे.
मोदींनी राजस्थानात निर्माण केलेले उद्योगांचे साम्राज्य आणि राज्यात क्रिकेटच्या विस्तारासाठी दिलेले योगदान पाहता त्यांना पद्म पुरस्कार दिला जावा अशी खुद्द राजेंनी राजस्थान क्रीडा परिषदेद्वारे शिफारस केली होती.त्यावेळी मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.
दरम्यान, राज्य सरकारने मोदींना पद्म पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारने फेटाळून लावली होती. लिम्बा राम यांना २०१२ मध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव सुभाष जोशी यांनी मात्र पद्म पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची शिफारस करण्यात काही गैर नव्हते असे म्हटले आहे.
आयपीएलच्या माजी आयु्क्तांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यात काहीही आक्षेपार्ह नाही. त्यावेळी ते आपली जबाबदारी चोख पार पडत होते, असे जोशी यांनी यावेळी सांगितले.
ज्यावेळी पद्म पुरस्कारासाठी मोदींची शिफारस केली त्यावेळी ते राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. क्रिकेटचे काम चांगल्याप्रकारे सुरु होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सहा आंतरराष्ट्रीय सामनेही पार पडले होते. त्यामुळे मोदींच्या अखत्यारित चांगले काम झाले होते.हा संपूर्ण राज्य सरकारचा निर्णय आहे की कोणाला या पुरस्काराने सन्मानित करावे आणि कसे करावे. त्यांनी या पुरस्कारांसाठी काही नावांची शिफारस केली. यात मोदींचे नावही होते. त्यामुळे त्याच आक्षेपार्ह काही नव्हते असे जोशी म्हणाले.