कृषिमालाची थेट विक्री इत्यादीच्या माध्यमातून शेतक-यांचे निव्वळ उत्पन्न वाढवणे व कृषिक्षेत्रात उद्योजकता वाढवण्यासाठी कृषिउद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) राबवण्यात येत आहे.
अलिबाग – जागतिक बँकेच्या साहाय्याने महाराष्ट्रात राबवण्यात येणा-या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी)अंतर्गत शेतक-यांच्या शेतमालाला गुणवत्तापूर्ण बनवणे, शेतमालाची काढणीपश्चात व्यवस्थापन प्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषिमालाची थेट विक्री इत्यादीच्या माध्यमातून शेतक-यांचे निव्वळ उत्पन्न वाढवणे व कृषिक्षेत्रात उद्योजकता वाढवण्यासाठी कृषिउद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) राबवण्यात येत आहे.
पीक उत्पादकता वाढ, उत्पादित मालाची गुणवत्ता वाढवून निव्वळ नफ्यात वाढ आणि बाजार संपर्क, पर्यायी बाजार व्यवस्था याद्वारे कृषी व्यावसायिकतेवर आधारित उद्योजकता विकास करण्यासाठी हा घटक राबवण्यात येत आहे. काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प अहवाल, मूल्यवíधत व प्रक्रिया, प्रतवारी व पणनसंदर्भात प्रकल्प अहवाल, कृषी व पणनविषयक प्रकल्प अहवाल, कृषी मूल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरणविषयक प्रकल्प अहवाल, कृषी व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी उपक्रम- जसे अॅग्री ग्रीन क्लिनिक्स व अॅग्री बिझनेस सेंटर, शेतकरी गटाने, संघाने कृषी अवजारे सामूहिक भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन याबाबत प्रोत्साहन देणारे प्रकल्प अहवाल, पशुसंवर्धन- जसे छोटे जनावरांचे उदा. शेळी, मेंढी संबंधित प्रकल्प अहवाल इत्यादी प्रकल्पांची ईडीपी उपक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत फक्त मशिनरी व उपकरणे या बाबींकरताच अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुढे जे प्रकल्प नव्याने सुरू होतील, तेच प्रकल्प ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे झाल्यास फक्त राष्ट्रीयीकृत बँकमार्फतच देण्यात येणार आहे. खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.
प्रकल्प व लाभार्थी निवड प्रक्रियेंतर्गत शेतकरी उत्पादक गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असणे आवश्यक राहील. उद्योजकांची निवड जिल्हास्तरीय निवड समितीद्वारे करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय निवड समितीच्या मान्यतेनंतर प्रकल्पाची अंमलबजावणी प्रकल्प संचालक (आत्मा) करतील. या योजनेचे कार्यक्षेत्र तालुका कृषी अधिकारी अलिबाग, पेण, माणगाव, खालापूर हे असेल. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, अलिबाग, पेण, माणगाव, खालापूर तसेच प्रकल्प संचालक (आत्मा) वेश्वी नर्सरी, अलिबाग येथे संपर्क साधता येईल.