लेट मार्क चुकवण्यासाठी लोकलला लोंबकळत निघाला आणि खाली पडून प्राणास मुकला
वसई – रेल्वेतील गर्दीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पोटासाठी या गर्दीतून प्रवास करणे चिंताजनक बनत चालले आहे. प्रवाशांचा सुरक्षिततेची हमी राहिलेली नाही. अशाच गर्दीने मंगळवारी (१५ ऑगस्ट) २३ वर्षीय युवकाचा बळी घेतला. नालासोपारा-वसईच्या मध्ये खांबावर आदळून तो लोकलमधून पडला आणि मृत्यू पावला. परीक्षित अलवा असे त्याचे नाव आहे. कामावर निघालेल्या मुलाच्या अपघाताचे वृत्त येताच अलवा कुटुंबीय हादरून गेले.
नालासोपारा येथे राहणारा परीक्षित मीरा रोड येथे नोकरीसाठी जायचा. मंगळवारीही नेहमीप्रमाणे सकाळी तो कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला आणि काही वेळातच त्याच्या अपघाताचे वृत्त घरी थडकले. परीक्षित मुर्तूल फायनान्समध्ये ४ महिन्यांपूर्वीच कामाला लागला होता. मित्रांनी गर्दी पाहून ट्रेन सोड असे त्याला सांगितले, पण लेट मार्क मिळतो, जावेच लागेल, असे सांगून तो ट्रेनमध्ये चढला होता.
परीक्षितने नालासोपारा स्थानकातून लोकल ट्रेन पकडली होती. खचाखच भरलेल्या डब्यात प्रयत्न करूनही तो आत शिरू शकला नाही. ट्रेनने स्थानक सोडल्यानंतर काही अंतरावर हात सुटून तो खाली पडला आणि जागीच मृत्यू पावला. परीक्षितच्या निधनाने संपूर्ण छेडा नगर परिसरात शोककळा पसरली आहे. परीक्षितच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच नगरसेविका सुषमा दिवेकर, नगरसेविका नीलिमा कांबळे यांनी त्याच्या घरी जाऊन पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. परीक्षितवर समेळपाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.