स्टार’ ख्रिनो रोनाल्डोने फॉर्म कायम ठेवत सलग दुस-या लढतीत हॅटट्रिक नोंदवल्याने रेआल माद्रिदला चॅँपियन्स लीगमध्ये बुधवारी हॉलंडच्या अजॅक्स संघावर ४-१ असा मोठ्याफरकाने विजय मिळवता आला.
अॅमस्टरडॅम– स्टार’ ख्रिनो रोनाल्डोने फॉर्म कायम ठेवत सलग दुस-या लढतीत हॅटट्रिक नोंदवल्याने रेआल माद्रिदला चॅँपियन्स लीगमध्ये बुधवारी हॉलंडच्या अजॅक्स संघावर ४-१ असा मोठ्याफरकाने विजय मिळवता आला. रेआलचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला.
स्पॅनिश ला-लिगामध्येही रविवारी रोनाल्डोने हॅटट्रिक नोंदवली होती. त्याने ४२व्या, ७९व्या आणि ८१व्या मिनिटाला गोल केले. त्याला करिम बेन्झेमाची (४८व्या मिनिटाला) चांगली साथ लाभली. गोलसंख्या वाढवण्याची संधी रेआलला होती. प्रतिस्पर्धी गोलकीपर केनेथ वर्मीरने त्यांना अधिक वरचढ होऊ दिले नाही. अजॅक्सकडून निक्लॅस मोइसॅँडरला (५६व्या मिनिटाला) एकमेव गोल करता आला. या विजयासह रेआलने ‘डी ग्रूप’मध्ये सहाणांसह अव्वल स्थान राखले. माद्रिदचा हा विजय रविवारी (सात ऑक्टोबर) होणा-या ‘अल-क्लासिको’ लढतीसाठी (बार्सिलोनाविरुद्ध) प्रेरणादायी ठरेल.
बालोतेलीचा निर्णायक गोल
मॅँचेस्टर- मारियो बालोतेलीने शेवटच्या मिनिटाला पेनल्टीवर केलेल्या गोलमुळे मॅँचेस्टर सिटीला घरच्या मैदानावर जर्मनीच्या बोरुसिया डॉर्टमंडविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधता आली. डॉर्टमंडच्या नेवेन सुबोटिकच्या हाताला बॉल लागल्याने सिटीला पेनल्टीची संधी मिळाली. त्याचा फायदा उठवत सिटीने पराभव टाळला. तत्पूर्वी, ६१व्या मिनिटाला मार्को रेयूसने डॉर्टमंडला आघाडी मिळवून दिली. मात्र नशीब जोरावर असल्याने सलग दुसरा पराभव टाळण्यात सिटीला यश आले. ‘डी ग्रूप’मधील पहिल्या लढतीत सिटीला रेआल माद्रिदकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. बाद फेरीच्या आशा ठेवण्यासाठी सिटीला डॉर्टमंडविरुद्ध पराभव टाळणे गरजेचे होते.
आर्सेनलची आगेकूच सुरूच
लंडन- ग्रीसच्या ऑलिंपियाकोसवर ३-१ अशी मात करत आर्सेनलने सलग दुसरा विजय नोंदवला. गेर्विनोने ४२व्या लुकास पोडोलस्कीने ५६व्या मिनिटाला गोल आणि अॅरन रामसेने ‘इंज्युरी टाइम’मध्ये (९०+४) महत्त्वपूर्ण गोल करत विजयात योगदान दिले. ऑलिंपियाकोसकडून एकमेव गोल कोस्टास मिट्रोग्लयूने पहिल्या सत्राच्या ‘इंज्युरी टाइम’मध्ये (४५+१) एकमेव गोल केला. या विजयाबरोबरच आर्सेनलने ‘बी ग्रूप’मध्ये सहा गुणांसह आघाडी कायम ठेवली आहे.