भाजपसाठी लखनऊ सुरक्षित मतदारसंघ असल्याने यंदा इथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह निवडणूक लढवत आहेत. मात्र राजनाथ सिंह यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नाही.
लखनऊ – उत्तरप्रदेशातील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी लखनऊ हा सर्वाधिक चर्चेत रहाणारा लोकसभा मतदारसंघ. लखनऊ शहराने स्वत:ची अशी एक संस्कृती, पंरपरा जपली आहे ज्यामुळे लखनऊ शहर नेहमीच चर्चेत असते. राजकीयदृष्टया महत्वाचा असलेला लखनऊ लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लखनऊमधुन सलग पाचवेळा लोकसभेवर निवडून गेले. १९९१ पासून ते सक्रीय राजकरणातून निवृत्त होईपर्यंत वाजपेयींनी या मतदारसंघातून विजय मिळवला. वाजपेयींनंतर २००९ मध्ये त्यांच्या विश्वासातील लालजी टंडन इथून लोकसभेवर निवडून गेले. भाजपसाठी हा सुरक्षित मतदारसंघ असल्याने यंदा इथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह निवडणूक लढवत आहेत.
मात्र राजनाथ सिंह यांच्यासाठी ही लढाई वाटते तितकी सोपी नाही. कारण या मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि प्रस्थापित लोकप्रितिनीधीविरोधातील लाटेचा त्यांना सामना करावा लागणार आहे. गेल्या वीसवर्षाहून अधिककाळ लखनऊची खासदारकी भाजपकडे आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही प्रमाणात नाराजी आहे तसेच राजनाथ सिंह यांचे ब्राम्हण नसणे त्यांच्या विरोधात जाऊ शकते.
लखनऊमध्ये ब्राम्हण टक्का जास्त असल्याने भाजप वगळता सर्वच प्रमुख पक्षांनी इथून ब्राम्हण उमेदवार दिले आहेत. राजनाथ सिंह हे मूळचे ठाकूर आहेत त्यामुळे भाजपवर ब्राम्हणांऐवजी ठाकूरांना प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. लखनऊमधील भाजपची संघटनात्मक फळी आणि नरेंद्र मोदींची लाट यावर राजनाथ सिंह यांची भिस्त आहे.
लखनऊमध्ये मुस्लिम मतेही महत्वाची आहेत. ही मते सहाजिकच भाजपच्या विरोधातील आहेत. नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे राजनाथ सिंह विजयी होतील असा भाजप नेत्यांना विश्वास आहे. काँग्रेस, सपा आणि बसपामध्ये ब्राम्हण मतांची विभागणी होईल असा भाजपचा दावा आहे. यंदा इथून काँग्रेसकडून रिटा बहुगुणा जोशी, बसपकडून नकुल दुबे, सपाकडून अभिषेक मिश्रा आणि आपकडून जावेद जाफ्री रिंगणात आहे. मागच्या वेळी लालजी टंडन यांनी रिटा बहुगुणा जोशींचा फक्त ४० हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.