दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा पथकांनी संयुक्त कारवाई करुन, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली.
श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधील कुलगाममध्ये शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा पथकांनी संयुक्त कारवाई करुन, पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली. मोहोम्मद नावीद जत ऊर्फ छोटू असे या दहशतवाद्याचे नाव असून, तो काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर म्हणून काम करत होता.
मोहोम्मद जत कुलगाममध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे विशेष कारवाई पथक, राष्ट्रीय रायफल ६२ बटालियन आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शोध मोहिम सुरु केली होती. मोहोम्मद जत पळून जाण्यापूर्वी किंवा त्याने गोळीबार करण्यापूर्वी जवानांनी त्याला शिताफीने अटक केली.
मूळचा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील असलेला मोहोम्मज जत गेल्या दोन वर्षांपासून दक्षिण काश्मीरमध्ये सक्रीय होता. लष्करचा काश्मीरमधील प्रमुख अबू कासीमबरोबर तो काम करत होता. काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो सहभागी होता. चौकशीला सुरुवात करण्यापूर्वीच मोहोम्मद जतने लोकसभा निवडणुकी दरम्यान पुलवामाच्या जिल्हा न्यायालयाबाहेर दोन पोलिस अधिका-यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.