हिवाळा संपत आलेला असतानाच; शुक्रवारी पहाटेपासून पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात दाट धुके पसरले होते. थंडगार वारे आणि दाट धुके यामुळे ख-या अर्थाने हिवाळा अनुभवता आला.
पुणे – हिवाळा संपत आलेला असतानाच; शुक्रवारी पहाटेपासून पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात दाट धुके पसरले होते. थंडगार वारे आणि दाट धुके यामुळे ख-या अर्थाने हिवाळा अनुभवता आला.
लोणावळा परिसरात सर्वत्र मोठय़ा प्रमाणात धुके पसरल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गाचा वेग मंदावला होता. अवघ्या १० फूट अंतरावरीलदेखील नीट दिसत नसल्याने अनेक वाहनचालकांनी खबरदारी म्हणून वाहने रस्त्याच्या कडेला पार्किंग लाईट लावून उभी केली होती. काही चालक अगदी कमी वेगात हळूवारपणे वाहने चालवत असल्याचे दृष्य होते. सकाळी शाळेत जाणारी शाळकरी मुले व स्कूलचालक हे या धुक्यात हरवले होते.
वरसोली टोलनाका वाहनचालकांना दिसावा, याकरता टोलनाक्यांवरील दिवे चालू ठेवण्यात आले होते. वरसोली टोलनाका परिसरात मागील काही दिवसांपासून लोणावळा नगरपरिषदेचा कचरा डेपो पेटतो आहे. सुरुवातीला या भागातील नागरिकांना हा धूर आहे का धुके, हेच कळत नसल्याने नागरिकांत काहीशी भीती निर्माण झाली होती. प्रचंड मोठय़ा प्रमाणात धुक्याचे काहूर माजल्याने व त्यातच कचरा डेपोचा धूर मिसळल्याने वरसोली, वाकसई चाळ, वाकसई, डोंगरगाव, सदापूर, देवघर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुण्यात पाऊस?
पाऊस पडण्यास पोषक वातावरण तयार झाल्याने पुण्यासह राज्याच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यात शुक्रवार सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे. शहर आणि परिसरात पहाटेच्या वेळी धुके पसरले होते. अरबी समुद्रात असलेली द्रोणीय स्थिती, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड परिसरात उष्ण व थंड वा-याचे होत असलेले एकत्रीकरण यामुळे गेले दोन दिवस राज्यात ढगाळ हवामान तयार होत आहे. दिवस-रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. दरम्यान, विषुवृत्ताजवळील हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून; त्याची तीव्रता वाढत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दक्षिण भारतातील राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल हवामान झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच काळात फेब्रुवारी-मार्च महिनात राज्यात गारपीट झाली होती.