पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर चौघे जण गंभीर जखमी झाले.
पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले, तर चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजता कुसगाव येथे सिंहगड कॉलेजसमोर घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उषा नागूराव बोरकर (५५), त्यांचा मुलगा प्रवीण नागूराव बोरकर (३०), जावई नरसिंगराव किसनराव पतंगे (४२, सर्व जण रा. नांदापूर, कळंबोली, नांदेड) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर गाडीचा चालक अब्दुल अजिज कलिम (२७, रा. हैदरबाग, वेंगलुरनाका, नांदेड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वर्षा प्रवीण बोरकर (३०), प्रशांत नागूराव बोरकर (३३), डॉ. आशीष दिवाकर मोरेश्वर (२७), गाडीचा दुसरा चालक अब्दुल हमिल वाघवान कुलारी हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील ग्लोबल रुग्णालयातून वर्षा बोरकर यांना एका रुग्णवाहिकेमधून चेंबूर, मुंबई येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात येत होते. दरम्यान, लोणावळ्यानजीक असलेल्या सिंहगड कॉलेजसमोर गाडी आली असता चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला. त्यामुळे भरधाव रुग्णवाहिका रस्त्याच्या मधोमध असलेल्या चेंबरवर आदळून अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिस, महामार्ग पोलिस, लोणावळा शहर व ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
तत्पूर्वी आयआरबीच्या कर्मचा-यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करत अपघातग्रस्त रुग्णवाहिका बाजूला केली. दरम्यानच्या काळात मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ थांबविण्यात आल्याने द्रुतगती महामार्गावर दोन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.