डुकराच्या शिकारासाठी लावलेल्या विद्युतभारीत तारेचा झटका लागून लांजा तालुक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राजापूर तालुक्यात वाळवड गावात असाच प्रकार बुधवारी सायंकाळी घडला.
राजापूर- डुकराच्या शिकारासाठी लावलेल्या विद्युतभारीत तारेचा झटका लागून लांजा तालुक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राजापूर तालुक्यात वाळवड गावात असाच प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. यात अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ज्याने आपल्या शेतात ही फासकी लावली होती त्याने घाबरून जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तो देखील अत्यवस्थ आहे.
डुकराच्या शिकारीसाठी शेतात लावलेल्या या विद्युतभारीत तारेला स्पर्श झाल्याने जोरदार झटका लागून अनंत तळेकर (४३, रा. वाळवड पाटीलवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. ज्यांनी आपल्या शेतात अशा पद्धतीने विद्युत तारेची फासकी लावली त्या सुभाष राजाराम पडवळ रा. वाळवड पाटीलवाडी यांनी घाबरून जाऊन घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने ते अत्यवस्थ अवस्थेत आहेत. बुधवारी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान वाळवड निव्याचामाळ या परिसरात ही घटना घडली.
या प्रकरणी नितीन आकाराम पडवळ यांनी राजापूर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी सुभाष पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन व अनंत हे दोघे बुधवारी सायंकाळी मासेमारीसाठी जात होते. वाळवड निव्याचामाळ येथील नाचणीच्या शेतातून जात असताना शेतात असणा-या विद्युत भारीत तारेला अनंत यांचा पाय लागला. जबरदस्त शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आपण लावलेल्या या विद्युत भारीत तारेच्या फासकीमुळे अनंत यांचा मृत्यू झाल्याचे कळताच अस्वस्थ झालेल्या व घाबरून गेलेल्या सुभाष याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला पोलिस राजापूरला आणत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. पोलिसांनी त्याच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवले आहे.