धनदांडग्या पर्ससीनवाल्यांना पालकमंत्र्यांकडून अभय,कारवाई न झाल्यास संघर्ष उफाळणार, वेंगुर्ला बंदरातील पारंपरिक मच्छीमारांचा मत्स्य आयुक्तांना इशारा
मालवण – वेंगुर्ले बंदरात बेकायदेशीर मिनी पर्ससीन होडय़ांनी मोठय़ा प्रमाणावर हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. शासनाचे सागरी नियम धाब्यावर बसवून या नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करीत आहेत. याचा परिणाम म्हणून वेंगुर्ले येथे पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी करणे दुरापास्त झाले आहे. मत्स्यविभागाच्या वारंवार निदर्शनास आणूनही याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे. धनदांडग्या पर्ससीनवाल्यांना राजकीय वरदहस्तही लाभला आहे. यामुळेच अनधिकृत पर्ससीनवाल्यांची मुजोरी वाढली आहे. नजीकच्या काळात अनधिकृत मासेमारीवर कारवाई न झाल्यास वेंगुर्ले बंदरात संघर्षाची स्फोटक परिस्थिती निर्माण होणार आहे. याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा वेंगुर्ले येथील पारंपरिक मच्छीमारांच्या संघटनेने दिला.
मंगळवारी पारंपरिक मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त राजकुमार महाडिक यांची मालवण येथे भेट घेतली. यावेळी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी संतोष देसाई, परवाना अधिकारी सतीश खाडे, प्रतीक महाडवाला यांच्याबरोबरच मच्छीमार नेते रवीकिरण तोरसकर, सुभाष गिरप, छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, दादा केळुसकर, काशीराम आरावंदेकर, भाग्यवान गिरप, सहदेव गिरप, कमलाकांत कुबल आदी उपस्थित होते.
पारंपरिक मच्छीमार आक्रमक
मत्स्य हंगाम चालू झाल्यापासून वेंगुर्ले समुद्रात मिनी पर्ससीनचा हैदोस सुरू झाला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून पारंपरिक मच्छीमारांच्या देखत त्यांच्या हक्काच्या मासळीची लयलूट सुरू आहे. मत्स्यविभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. धनदांडग्या पर्ससीनवाल्यांच्या विरोधात मत्स्यविभाग मूग गिळून गप्प राहिल्यास हेच पर्ससीनवाले वाळुमाफियांप्रमाणे मुजोर बनतील आणि मत्स्य अधिका-यांवरच भविष्यात हल्ले करतील. यामुळे मत्स्यधिका-यांनी ‘सिंघम’ बनून कारवाई करणे आवश्यक आहे. दोन दिवसांत कारवाई न झाल्यास पारंपरिक मच्छीमारांना आक्रमक व्हावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संयुक्त गस्त चालू करा
मागील दोन वर्षात पर्ससीन नौकांच्या नूतनीकरणासाठी जेवढे प्रस्ताव आले आहेत व ज्या नौकांचे नूतनीकरण केले गेले आहे, अशा नौकांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तोरसकर यांनी केली. त्याचप्रमाणे अनधिकृत मासेमारीवर कारवाई करण्यासाठी स्थानिक मच्छीमार, कोस्ट गार्ड, पोलीस व मत्स्याधिकारी यांची संयुक्त गस्त सुरू करण्यात यावी, असे छोटू सावजी म्हणाले.
पालकमंत्री दबावाखाली
पालकमंत्र्यांच्या डोळय़ादेखत वेंगुर्ल्यात अनधिकृत पर्ससीनवाले पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय करीत आहेत. निवडणुकांना सामोरे जाताना पालकमंत्री केसरकरांबरोबरच येथील आमदार आणि खासदार यांनी अनधिकृत मासेमारी बंद करू, अशी भूमिका घेतली होती; परंतु या लोकप्रतिनिधींना आपल्या आश्वासनाचा आता विसर पडला आहे. मच्छीमारांसाठी अंमलबजावणी कक्ष अजूनही स्थापन झालेला नाही. गस्तीनौका देण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करीत आहे. अपु-या मनुष्यबळामध्ये मत्स्यव्यवसाय कार्यालयाला कारवाई करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय, मच्छीमारांना राजकीय वरदहस्त आहे. पालकमंत्री धनदांडग्या मच्छीमारांच्या दबावाखाली असल्याचा आरोप यावेळी मच्छीमारांनी केला.