आसाराम बापूंचा सेवेकरी शिवाच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ क्लीप सापडल्याने आसाराम गोत्यात आले आहेत.
जोधपूर- अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूंचा सेवेकरी शिवाच्या मोबाईलमध्ये राजस्थान पोलिसांना एक अश्लिल व्हिडीओ क्लीप मिळाली आहे. शिवाने पोलिस चौकशीदरम्यान आश्रमात ‘ध्यान की कुटीया’ येथे अश्लिल व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे सांगितले होते. पोलिसांना चित्रीकरणाची सीडी अद्याप सापडलेली नाही, मात्र शिवाच्या मोबाईलमध्ये एक अश्लिल व्हिडीओ क्लीप मिळाली आहे.
सीडीसाठी पोलिस आश्रमात कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक स्फोटक माहिती उघड होत आहे. व्हिडीओ चित्रीकरण करुन महिलांना ‘ब्लॅक मेल’ केले जात असे. शिवा हा आसाराम बापू आणि छिंदवाडा आश्रमातील वॉर्डन शिल्पी आणि प्रकाश यांच्यात मध्यस्थाची भूमिका निभावत असल्याचे उघडकीस आल्याचे पोलिस उपायुक्त अजय पाल लांबा यांनी सांगितले. मुलगी हेरुन तिला काही भूतबाधा झाल्याचा बनाव करुन उपचार करण्यासाठी आसाराम यांच्याकडे पाठवण्याचे काम शिल्पी करायची, असेही लांबा यांनी सांगितले. सध्या शिल्पी आणि प्रकाश दोन्ही फरार आहेत. शिवा, शिल्पी आणि पिडीत मुलीच्या पालकांमध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान फोनवर अनेकदा संवाद झाल्याचे दिसून येते.
यातील शिवा किंवा शिल्पी यांपैकी एकाला सरकारी साक्षीदार बनवून जलदगती न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल असे अतिरिक्त महाधिवक्ता आनंद पुरोहित यांनी सांगितले.
१५ ऑगस्टला या पिडीत मुलीवर अत्याचार झाल्याचे तिने २० ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यानंतर लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बापू यांना ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जोधपूर पोलिसांनी इंदूर येथील त्यांच्या आश्रमातून अटक केली. त्यावेळी आसाराम बापूंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र एक सप्टेंबर रोजी त्यांना जोधपूर येथे आणल्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी बापूंना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले होते. रुग्णालयात त्यांची पुरुषार्थ चाचणी करण्यात आली. या चाचणीत बापू पास झाले.
त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायदंडाधिकारी मनोज कुमार यांनी त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्या वकिलाने आसाराम बापूंच्या जामिनासाठी अर्ज केला असून त्याबाबतची सुनावणी प्रलंबित आहे.
दरम्यान, आसाराम यांनी आपल्याला आजार जडला असून या आजारावर उपचार करण्यासाठी महिला डॉक्टरची मागणी तुरुंग अधिका-याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच या महिला डॉक्टरने किमान आठ दिवस दररोज दोन तास आपली सेवा करावी, अशीही मागणी केली आहे. त्याबाबत शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.