व्हॉट्स अॅपवरुन एका पुरुषाची बदनामी केल्याप्रकरणी सौदी अरबियातील एका महिलेला चक्क ७० चाबकांच्या फटक्यांची शिक्षा देण्यात आली.
जेदाह – सोशल मिडीयावरुन बदनाम करण्याच्या घटना ब-याचदा घडत असतात. असे कृत्य करणा-यांना दंडाची अथवा तुरुंगाची शिक्षाही केली जाते. मात्र व्हॉट्स अॅपवरुन एका पुरुषाची बदनामी केल्याप्रकरणी सौदी अरेबियातील एका महिलेला चक्क ७० चाबकांच्या फटक्यांची अनोखी शिक्षा देण्यात आली. तसेच तिला पाच हजार ३३२ अमेरिकन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला.
पूर्व सौदी अरेबियातील गुन्हे न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. या प्रकऱणी महिला दोषी आढळल्याने न्यायालयाने तिला ७० चाबकांच्या फटक्यांची शिक्षा तसेच २० हजार सौदी रियाल(पाच हजार ३३२ अमेरिकन डॉलर)चा दंड ठोठावला आहे. दोषी महिलेनेही आपला गुन्हा कबूल केला.
सौदीच्या सायबर गुन्हे प्रतिबंधक कायद्यानुसार एखाद्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने कोणत्याही व्यक्तीने दुस-या व्यक्तीची बदनामी केल्यास आरोपीला एका वर्षाहून अधिक तसेच ५० लाख सौदी रियालहून अधिक दंड ठोठावण्यात येऊ शकत नाही.
गेल्या वर्षी जुलैमध्ये व्हॉट्सअॅपवरुन एकमेकांची बदनामी करणा-या दोन महिलांना १० दिवसांचा तुरुंगवास आणि २० चाबकांच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.