ताल, घुंगरू, नाद व प्रकाश असा गायन-वादन-नृत्याचा मिलाफ असणा-या शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध झाले.
पुणे- ताल, घुंगरू, नाद व प्रकाश असा गायन-वादन-नृत्याचा मिलाफ असणा-या शनिवारवाडा नृत्य आणि संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध झाले. भरतनाटयम् नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा आणि ओडिसी नृत्य निपुण झेलम परांजपे यांची ‘शिवशंकर’ ही नृत्यनाटिका महोत्सवाचे खास आकर्षण ठरली.
शनिवारवाडा नृत्य व संगीत महोत्सवाचे अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सबीना संघवी, प्रभा पटवर्धन, मनीषा साठे, रेखा कृष्णन, पारूल मेहता यांच्या हस्ते महोत्सवाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. प्रारंभी ज्येष्ठ नृत्यांगना उमा घोडगे व सहकाऱ्यांनी नृत्याविष्कारातून ‘गणेश वंदना’ सादर केली.
त्यानंतर पुण्यातील समरचना नृत्यसंस्थेच्या ११ कलावंतांनी भरतनाटयम् नृत्यशैलीतून संतांच्या कथांवर आधारित ‘संकीर्तन’ हा अविस्मरणीय नृत्य कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये १३व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंतच्या महाराष्ट्रातील संतांच्या शिकवणीवर आधारित बेतलेला भरतनाटयम् दाक्षिणात्य शैलीतील नृत्याविष्कार होता. त्याला महाराष्ट्रीय संगीताची जोड लाभली होती.
यामध्ये संत गोरा कुंभार, जनाबाई, सावता माळी, कान्होपात्रा आदींच्या रचनांवर बेतलेले अभंग आणि कीर्तन ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजरात सादर झाले. ‘संकीर्तन’ कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. मध्यांतरानंतर भरतनाटयम् नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा आणि झेलम परांजपे यांची ‘शिवशंकर’ ही नृत्यनाटिका सादर झाली.
त्यांनी प्रथम शंकराचार्याचा अर्धनटेश्वर श्लोक सादर केला. त्यानंतर डॉ. संध्या पुरेचा यांनी भरतनाटयम् शैलीतून पार्वती आणि झेलम परांजपे यांनी ओडिसी नृत्यातून शिवाचे एकत्रित सादरीकरण केले.
यापाठोपाठ नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा व सहकाऱ्यांनी शिवदर्शनाची अनोखी रूपे सादर केली. भरतनाटयम् आणि ओडिसी या दोन्ही नृत्यशैलींतून शिवश्लोक व आरती सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.