बीसीसीआय अध्यक्ष ते आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन या प्रवासाने शशांक मनोहर यांच्या कारकीर्दीचे वर्तुळ पूर्ण झाले.
मुंबई- बीसीसीआय अध्यक्ष ते आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन या प्रवासाने शशांक मनोहर यांच्या कारकीर्दीचे वर्तुळ पूर्ण झाले. आयसीसी चेअरमनपदासाठी मनोहर हे बीसीसीआयचे उमेदवार होते.
मात्र मंगळवारी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा नाराजीने द्यावा लागला, या त्यांच्या खुलाशाने खळबळ माजली. मात्र बिनविरोध निवड झाल्यानंतर मनोहर यांनी आनंद व्यक्त केला आहे.
आयसीसीच्या घटनेत बदल करताना स्वतंत्र चेअरमनपदाची नियुक्ती करण्यात आली. मात्र या पदावर नियुक्त होणारी व्यक्ती कुठल्याही क्रिकेट बोर्डाची पदाधिकारी नसावी, असा नियम फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून निवडून येण्याचा मान मनोहर यांनी मिळवला.
बिनविरोध निवडून येणारे ते पहिले चेअरमन आहेत. शशांक मनोहर यांनी २००८-११ या कालावधीत पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या गळय़ात पुन्हा अध्यक्षपदाची माळ पडली.
स्वच्छ प्रतिमेचे प्रशासक म्हणून मनोहर यांची ओळख आहे. स्वच्छ प्रतिमेसह त्यांनी पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य दिले. दुस-या टर्ममध्येही मनोहर यांनी आपली प्रतिमा जपली. २०१३ आयपीएल मॅचफिक्सिंग आणि बेटिंग प्रकरणानंतर बीसीसीआय अडचणीत आली आहे.
बीसीसीआयचा कारभार पारदर्शक होण्याहेतूने सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या अटी अमलात आणण्यासाठी बीसीसीआयवर दबाव आहे. अशावेळी मनोहर यांच्यासारख्या मुरब्बी क्रिकेट प्रशासकाची आवश्यकता होती. मात्र आयसीसीलाही एक खमके नेतृत्व हवे होते. त्यामुळे मनोहर यांना आयसीसी चेअरमनपदी बढती देण्यात आली.
बीसीसीआयकडून स्वागत
मनोहर यांच्या निवडीचे बीसीसीआयने स्वागत केले आहे. ‘‘मनोहर यांची आयसीसी स्वतंत्र चेअरमनपदी निवड झाल्याने आनंद झाला. त्यातच बिनविरोध निवड ही बीसीसीआयसह समस्त भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या रूपाने आयसीसीला एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे,’’ असे बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी सांगितले.
बीसीसीआयचा अध्यक्ष तिस-यांदा आयसीसीवर
नवी दिल्ली- शशांक मनोहर यांच्या रूपाने बीसीसीआयचा अध्यक्ष तिस-यांदा आयसीसीवर निवडून गेला आहे. मात्र आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमनपद भूषवणारे आणि बिनविरोध निवडून येणारे मनोहर जगातील पहिले क्रिकेट प्रशासक आहे.
मनोहर यांच्यापूर्वी जगमोहन दालमिया आणि शरद पवार यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. दालमिया हे १९९७-२००० या कालावधीत तसेच पवार हे २०१०-१२ या कालावधीत अध्यक्ष होते.