देवगड तालुक्यातील कोटकामते, वळकूवाडी, भटवाडी डिजिटल शाळांचे उद्घाटन
देवगड – मी टाटा ट्रस्टच्या मदतीने माझ्या मतदारसंघातील शंभर शाळा डिजिटल केल्या आहेत. एकाच वेळी शंभर शाळा डिजिटल असणारा हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे. शहरी भागामध्ये सुविधा मिळत असल्याने, विद्यार्थ्यांची शहरी भागाकडे अधिक ओढ आहे. तशा सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात. त्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा. जेणेकरून ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे. देवगडचा शैक्षणिक विकास याच आधारे व्हावा आणि येथून चांगले नागरिक घडावेत, अशी अपेक्षा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.
देवगड तालुक्यातील कोटकामते प्राथमिक शाळा देवगड जामसंडे नगरपंचायतीतील वळकूवाडी व भटवाडी प्राथमिक शाळा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून डिजिटल करण्यात आल्या. त्यावेळी आमदार राणे यांनी ग्रामीण शैक्षणिक धोरणाबाबत त्यांचे विचार मांडले. आमच्या उपक्रमाची दखल सरकारनेही घ्यावी, असे आ. राणे यावेळी म्हणाले. ‘‘टाटा ट्रस्टकडे शाळा डिजिटल करण्याची संकल्पना मांडली त्यावेळी त्यांनी या संकल्पनेचे स्वागत केले. अशा प्रकारची संकल्पना देशात सर्वत्र राबवू, असे ते म्हणाले. ही संकल्पना माझ्या मतदारसंघात राबवू शकलो, याचा अभिमान वाटतो,’’ असे त्यांनी सांगितले.
कोटकामते शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुनाथ घाडी यांनी आमदार राणे यांचे स्वागत केले. त्यानंतर कोटकामते आडिवरेवाडी या शाळेत सुरू असलेल्या बालक-पालक मेळाव्याला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. तसेच पालकांना मार्गदर्शन केले.
आ. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भटवाडी आणि वळकूवाडी येथे डिजिटल क्लासरूमचा शुभारंभ करण्यात आला. वळकूवाडी येथील कार्यक्रमावेळी ते म्हणाले की, ‘‘माजी आमदार आप्पा गोगटे यांच्या विचारांचा प्रभाव संपूर्ण तालुक्यावर आहे. त्यांच्या गावातील शाळेचा शुभारंभ करताना मला विशेष आनंद होत आहे.