महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सिंधुदुर्गनगरी येथे बुधवार पासून सुरु झालेल्या १६ व्या त्रैवार्षिक महाअधिवेशनाचा समारोप गुरुवारी सकाळी १० वाजता होत असून यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिक्षक दाखल झाले आहेत.
भा. वा. शिंपी गुरुजी नगरी- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सिंधुदुर्गनगरी येथे बुधवार पासून सुरु झालेल्या १६ व्या त्रैवार्षिक महाअधिवेशनाचा समारोप गुरुवारी सकाळी १० वाजता होत असून यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिक्षक दाखल झाले आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, दादा भुसे, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनासाठी सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस मैदानावर संघटनेचे संस्थापक भा. वा. शिंपी गुरुजी यांच्या नावाने नगरी उभारण्यात आलेली आहे. संघटना राज्याध्यक्ष काळू बोरसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या समारोप कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार होते. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत यांचे दौरे निश्चित झाले नव्हते. २०१८ चे प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक महाअधिवेशन सिंधुदुर्गात होत असल्याने यजमान असलेल्या सिंधुदुर्ग शाखेने जोरदार तयारी केली आहे. पोलीस मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
कार्यक्रमस्थळी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिक्षक समितीचे सभासद दाखल झाले आहेत. यासाठी शिक्षक नेते विश्वनाथ (आण्णा) मिरजकर, नाना जोशी, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ प्रभाकर आरडे हे दाखल झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील शिक्षक समितीचे राज्य व विभाग नेते तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सभासद दाखल झाले आहेत. यावेळी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.