२५ डिसेंबर ते एक जानेवारी या एका आठवड्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टला भाविकांकडून रोख आणि दागिन्यांसह सुमारे ११.५० कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.
शिर्डी – नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देशातील शेकडो लोक शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतात. यावेळी भाविकांकडूनही साईबाबांच्या चरणी कोट्यावधींच्या देणग्या दिल्या जातात. २५ डिसेंबर ते एक जानेवारी या एका आठवड्यात शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टला भाविकांकडून रोख आणि दागिन्यांसह सुमारे ११.५० कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.
एक जानेवारी पर्यंत भारत तसेच परदेशातून आलेल्या आठ लाख भक्तांकडून रोख, डीडी, ऑनलाईम मनीऑर्डरच्या रुपात सुमारे ११.५० कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य लेखाअधिकारी दिलीप झिरपे यांनी दिली. ३० डिसेंबर ते एक जानेवारीदरम्यान सर्वाधिक ४.५३ कोटी रुपयांची देणगी जमा झाल्याचे झिरपे म्हणाले. एक जानेवारीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी सुमारे ९२ हजार १०० भक्तांनी शिर्डीला भेट दिली होती.
यामध्ये ६.९० कोटींची देणगी रोख स्वरुपात आली आहे, तर ६८ लाख रुपयांची देणगी सोन्याच्या दागिन्यांच्या स्वरुपात आली आहे. यासोबतच चार लाख रुपयांची देणगी चांदीच्या दागिन्यांच्या स्वरुपात तर उरलेली देणगींची रक्क्म डोनेशन, डीडी आणि ऑनलाईन मनी ऑर्डरच्या स्वरुपात जमा झाली आहे.