शीनाचा मृतदेह जिथे टाकण्यात आला होता तिथून पोलिसांना काही हाडे, मानवी कवटी आणि एक बॅग मिळाली आहे.
मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणात एक महत्वाचा पुरावा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. शीनाचा मृतदेह जिथे टाकण्यात आला होता तिथून पोलिसांना काही हाडे, मानवी कवटी आणि एक बॅग मिळाली आहे.
हत्या करुन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेणमधील जंगलात शीनाचा मृतदेह जाळण्यात आला होता. आणखी अवशेष मिळवण्यासाठी पोलिसांचे घटनास्थळी खोदकाम सुरु आहे.
मे २०१२ मध्ये रायगड पोलिसांनी केस, दात आणि काही हाडांचे नमुने मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात पाठवले होते. डिसेंबर २०१३ मध्ये रुग्णालयाने वय, लिंग आणि मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी इतके अवशेष पुरेसे नसल्याचे पोलिसांना कळवले होते.
त्यानंतर रायगड पोलिसांकडून रुग्णालयाला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. मुंबई पोलिसांकडे शुक्रवारी हे अवशेष सुपूर्द करण्यात आले.
शीना बोरा हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला शुक्रवारी बांद्रा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र शोधून काढण्यासाठी संजीव खन्नाची कोठडी आवश्यक आहे असा युक्तीवाद सरकारी वकिल लक्ष्मण राठोड यांनी न्यायालयासमोर केला.
संजीव खन्ना, इंद्राणी आणि ड्रायव्हर श्यामवर रायने रायगडच्या जंगलात जिथे पेट्रोल टाकून शीनचा मृतदेह जाळला तिथे संजीवला पोलिसांना घेऊन जायचे आहे असे सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले.
हत्या, अपहरण, गुन्हेगारी कारस्थान रचणे आणि पुरावे नष्ट करणे हे आरोप संजीव खन्नावर ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि पासपोर्ट जप्त केला आहे.
इंद्राणीला वकिल भेटू शकतात
इंद्राणीच्या वकिलांना तिला भेटू द्यावे असे आदेश बांद्रा न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहे. मुंबई पोलिस इंद्राणीला भेटू देत नसल्याबद्दल गुरुवारी इंद्राणीच्या वकिलांनी बांद्रा न्यायालयात याचिका दाखल केली होती.
बांद्रा न्यायालयाने आरोपींच्या हक्कासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जी मार्गदर्शतत्वे आखून दिली आहेत त्याचे पालन करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
मुंबईसह देशभरात खळबळ उडवणा-या शीना बोराच्या हत्याप्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहे. दररोज या प्रकऱणी नवनवीन खुलासे उघड होत आहेत. शीना बोरा हत्याप्रकरणी आज शीनाचा भाऊ मिखेल बोराला मुंबईला आणण्यात येत आहे. यावेळी त्याची याप्रकरणी चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
इंद्राणी मुखर्जीचा मुलगा असण्याचा दावा करणा-या मिखेल बोराने आपल्याकडे बहिण शीनाच्या हत्येसंबंधित काही पुरावे असल्याची माहिती गुरुवारी प्रसारमाध्यमांना दिली होती. त्याआधी मुंबई पोलिसांनी गुवाहाटी येथे जाऊन आरोपी इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखेल बोराची चौकशी केली होती.
खार पोलीस ठाण्यात इंद्राणी, तिचा चालक आणि राहुल मुखर्जी यांची चौकशी केल्यानंतर हत्येमागे काय हेतू होता याबाबत आम्हाला स्पष्ट कल्पना आली आहे. मात्र तिस-या आरोपी(संजीव खन्ना, इंद्राणी मुखर्जींचा आधीचा पती) मुंबईत पोहोचलेले नाहीत. त्यांची चौकशी होणे बाकी आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर याबाबतची अधिक माहिती आम्ही देऊ शकतो. असे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.