देशभर गाजत असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून काढून घेऊन सीबीआयकडे दिल्याचे गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी सांगितले.
मुंबई- देशभर गाजत असलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून काढून घेऊन सीबीआयकडे दिल्याचे गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी सांगितले. शीना बोरा प्रकरणात राकेश मारिया यांनी दिल्लीतील काही बडया व्यक्तींकडे मोर्चा वळवल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र शीनाची हत्या व मारिया यांच्या बदलीचा काहीही संबंध नसल्याचे बक्षी यांनी सांगितले.
शीना बोरा हत्या प्रकरणाने शुक्रवारी आणखी वेगळे वळण घेतले. शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिनेच आपल्या माजी पतीच्या मदतीने पोटच्या मुलीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक झाली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा तपास तीन वर्षानंतर लागला.
या हायप्रोफाईल केसचा तपास मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी स्वत:कडे घेतला होता. मात्र त्यांनी या प्रकरणाच्या खोलात जात दिल्लीतील काही बडया हस्तींची चौकशी सुरू करताच मारिया यांना बढती देऊन कमी महत्त्वाच्या समजल्या जाणा-या होमगार्डच्या महासंचालकपदी नेमण्यात आले.
राकेश मारिया यांना काही वरिष्ठ अधिका-यांना डावलून त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नेमण्यात आले होते. मात्र शीना बोरा प्रकरणात त्यांनी खोलात जाऊन काही बडया व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना हटविण्यात आले. तसा प्रसारमाध्यमातूनही आरोप झाला होता.
मारिया यांची बदली झाली असली तरी या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडेच ठेवण्यात येईल, असे सरकारच्या वतीने जाहीर केले होते. मात्र आता हा तपास मारिया यांच्याकडून काढून घेऊन तो सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यावरून मारिया यांच्या बदलीमागे बढतीपेक्षा वेगळेच कारण होते, हे स्पष्ट झाले आहे. तरीही बक्षी यांनी मारिया यांच्या बदलीचा आणि शीना बोरा हत्या प्रकरणाचा कोणताही संबंध नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला.