संदेश पारकर यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी काँग्रेसमधून हकोलपट्टी केली आहे.
कणकवली – संदेश पारकर यांची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी काँग्रेसमधून हकोलपट्टी केली आहे. पारकर यांनी पक्षाशी बेईमानी केलेली आहे. शिवसेना-भाजपाच्या मदतीने कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पाडला आणि पक्षातील काही काँग्रेसचे नगरसेवक फोडले. ही पक्षविरोधी कृ ती त्यांनी केली ती पक्षाच्या नियमाला धरून नसल्याने संदेश पारकर यांची पक्षातून करण्यात आलेली हकालपट्टी योग्यच आहे. संदेश पारकर यांचा काँग्रेस पक्षाशी आता काडीचाही संबंध राहिलेला नाही. पारकर हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटणार असे सांगत आहेत. मात्र माझ्या मनाविरुद्ध काँग्रेसमध्ये याला कोणीही स्थान देणार नाही, असे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संदेश पारकर यांनी यापुढे पक्षविरोधी कारवाई केल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही, वेळ आली तर त्याच्या सर्व गोष्टी बाहेर काढू, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. संदेश पारकर काय पायगुणाचा आहे, हे आम्हाला कळून चुकले आहे. आमचे खासदार, आमदार ते काँग्रेसमध्ये आल्यानंतरच पडले. एक-दोन ठेकेदार वगळता त्याचे काही अस्तित्व नाही. लालबत्ती मीच दिली, सिंचन महामंडळाचा उपाध्यक्ष मीच केला, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पारकर यांना भेट नाकारली
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांना आपली पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही. आपण याविरोधात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार, अशा वल्गना करून संदेश पारकर शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेण्यासाठी मुंबई येथे कोँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयात गेले होते. त्यांच्या भेटीसाठी ते तिष्ठत रांगेत उभे होते. मात्र त्यांना अशोक चव्हाण यांनी भेट दिली नाही.