संपत्ती देणार नसल्याचे समजताच पित्याची मुलाने हत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यातील पार्डी येथे घडली.
अमरावती- संपत्ती देणार नसल्याचे समजताच पित्याची मुलाने हत्या केली. तसेच वहिनीला मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना मोर्शी तालुक्यातील पार्डी येथे घडली. हत्या करणा-याने नंतर स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.
पार्डी येथील नामदेव ठाकरे (७०), असे मृत पित्याचे नाव असून, किसना (३१) त्याच्या मुलाचे नाव आहे. संगीता गजानन ठाकरे (२९) असे जखमी वहिनीचे नाव आहे. नामदेव ठाकरे यांचे १४ एकर शेत आहे. त्यांच्या दोन मुलांचा विरोध असतानाही त्यांनी ते शेत विकण्याचा घाट घातला. तसेच किसना राहत असलेले घर रिकामे करण्यास सांगितले.
दोन लहान मुले असल्याने किसनाने घर रिकामे करण्यास नकार दिला होता. मात्र नामदेवने रविवारी पुन्हा तगादा लावल्यामुळे संतापलेल्या किसनाने बाजेच्या ठाव्याने वडिलांच्या डोक्यावर वार केला. यात घटनास्थळीच नामदेवरावचा मृत्यू झाला.