गृहसजावटीसाठी बाजारात असंख्य वस्तू मिळतात, ब-याचदा त्या वस्तू पुष्कळ महाग असतात. स्वस्त दरात गृह सजावट करता आली तर क्या बात है! आपल्या घरी असलेल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि उपयोगाच्या वस्तूसुद्धा बनवता येतात. अगदी बाहेरच्या वस्तूंसारख्याच या वस्तू आकर्षक दिसतात, मात्र याला कल्पकतेची जोड असणं आवश्यक आहे.
घराचं नूतनीकरण म्हणजे मोठं खर्चिक काम. या कामासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. पण घरातच असलेल्या कित्येक टाकाऊ वस्तूंचा वापर आपण घर सजावटीसाठी करू शकतो. त्याला पारंपरिक वस्तूंची जोड असेल तर घराचा लुक एकदम बदलून जातो. त्यातही टाकाऊपासून टिकाऊ बनवताना पर्यावरणाचा -हासही कमी होण्यास मदत होईल. घरात अडगळीत पडलेल्या किंवा वापरात नसलेल्या अनेक वस्तू या निमित्ताने बाहेर येतील. त्यात परंपरागत चालत आलेल्या काही वस्तूंना झळाळी मिळेल. अशा या वस्तूंचा उपयोग गृहसजवटीत होऊ शकतो.
महिलांकडे साडयांचं खूप चांगलं कलेक्शन असतं. त्यातील कित्येक साडया आवडीच्या असतात म्हणून वर्षानुर्वष त्या फेकल्या जात नाहीत. या साडया वापरत नसतानाही त्याची जपणूक केली जाते. काही जणी मात्र त्या साडयांना जरासं काही लागलं तर त्या साडया सरळ फेकून देतात. मग अशा या साडयांपासून आपल्याला बरंच काही बनवता येतं. साडयांचे उत्तम कुशन बनवून घेऊ शकता. साडय़ांचे रंग गडद असल्यामुळे हे कुशन तुमच्या सोफ्याला एक वेगळा लुक देतील. हे कुशन तयार करताना, साडयांची जरीची किनारसुद्धा वापरू शकता. त्यामुळे थोडा पारंपरिक लुक येईल तसंच हे खर्चिकही नाही. या कुशन्सना आकर्षक बनवण्यासाठी त्यावर मोती किंवा बीट्स तसंच एखादी लेससुद्धा लावू शकता. साडयांचा आणखी एक चांगला फायदा म्हणजे घरातल्या खिडक्यांना साडयांचे पडदेदेखील करू शकतात. विचार केला तर थोडं वेगळं वाटतं पण तुम्ही जर रंगसंगती व्यवस्थित निवडली तर हे पडदे खूप आकर्षक दिसतात. तुमची खिडकी मोठी असेल तर तुम्ही दोन रंगांच्या साडयांचे पडदे शिवून घेऊ शकता. एका साडीचे दोन पडदे शिवल्यानंतर खिडकीच्या एका बाजूला एक आणि दुस-या बाजूला दुसरा पडदा लावा त्या पडद्यांच्या विरोधी रंगाची दुसरी साडी घ्या आणि त्याचा एकच पडदा शिवा. हा पडदा या दोन पडद्यांच्या मधोमध लावा. साडीचा कपडा शिल्लक राहीला असेल तर त्याच्या उशा करा. साडय़ांचा पडदा करायचा असेल तर अगदी डिझायनर साडया घेऊ नका. त्या खूप पातळ असतात.
जुन्या साडयांचा आणखी एक सुंदर वापर म्हणजे एक साडी घेऊन त्या साडीत पातळ असा कपडा टाकायचा आणि बेडरूमच्या गाद्यांवर, सोफ्यावर ही चादर टाकावी. घराला अगदी पारंपरिक लुक येईल. पण हे करताना थोडा घराच्या इंटिरीअरचा आणि रंगाचासुद्धा विचार करा. पूर्ण चादर करायची नसेल तर एखाद्या जुन्या बेडशिटवर पॅचवर्क करू शकता. प्लेन रंगांची चादर असेल तर त्यावर साडीतलं एखादं डिझाइन पॅचवर्क म्हणून लावल्यास त्या चादरीचा किंवा बेडशीटचं रुपडंच बदलून जाईल.
पूर्वी अंगावर पांघरूण म्हणून गोधडया असायच्या. कालांतराने या गोधडया तयार करणं बंद झालं आणि त्याऐवजी जाड चादरी आल्या. या चादरींना आईच्या गोधडयांसारखा उबदारपणा नसतो. यासाठीसुद्धा तुम्ही साडयांचा वापर करू शकता यात कॉटर्नच्या साडया वापरल्या तर जास्त उत्तम. ही गोधडी करताना एखादी रजईसुद्धा त्याच्या आत टाकू शकता आणि वरून मलमलच्या कपडय़ांनी गोंधडी पूर्ण बंद करावी. म्हणजे ती उबदारही होईल. या गोधडया तयार करण्यासाठी तुम्ही तुम्हाला नको असलेलं कापडसुद्धा वापरू शकता. ज्यांच्याकडे सोफा नसेल पण साध्या प्लास्टिकच्या खुर्च्या असतील तर त्यासाठीदेखील तुम्ही कव्हर तयार करून घेऊ शकता. ब-याचदा या प्लास्टिकच्या खुच्र्या भिंतीला लागून भिंतींचा रंग निघतो. या कव्हरमुळे रंग निघणार नाही तसंच त्या खुर्चीला थोडा मॉडर्न लुक येईल. हे कव्हर तयार करताना त्यात स्पंज टाकावा म्हणजे खुच्र्याना कव्हर व्यवस्थित बसेल.
ज्यांना वरती बसायला आवडत नाही ते सरळ खालतीच आपली मांड ठोकतात. थंडीचे दिवस असतील तर खाली चटई किंवा चादर टाकली तरीही थंड लागतं. यासाठी तुम्ही मोठेया आकाराच्या चौकोनी उशा तयार करून घेऊ शकता. ही उशी म्हणजे मीनी गादी असं म्हणायला हरकत नाही. या मिनी गादींसाठी तुम्ही साडयांचं कव्हर शिवून घेऊ शकता.
साडयांसारखेच घरात असे कित्येक टाकाऊ कपडे असतात. त्यात कॉटनचे कपडेसुद्धा असतात. अशा कॉटनच्या कपडयांची छान पायपुसणी होऊ शकतात. या पायपुसणीला गडद रंगाची किनार लावली की मस्त दिसेल. कॉटनच्या कपडयांनी तुम्ही अॅप्रन, मिक्सरला एखादं कव्हरसुद्धा शिवू शकता. जीन्स खराब झाली किंवा होत नसली की ती सरळ टाकली जाते. अशा जीन्सचेसुद्धा कव्हर बनवू शकता.
वर्तमानपत्र सगळ्यांच्याच घरी येतंच. एकदा का वर्तमानपत्र वाचला की त्याची रद्दी तयार होते. ही रद्दी देण्यामुळे पैसे मिळतात, हे खरं असलं तरीही रद्दी जाऊन कोण देईल हा प्रश्न नेहमीचाच. यासाठी या वर्तमानपत्राचा पुनर्वापर तुम्ही करू शकता. एका पेपरला एका रेषेत गुंडाळा किंवा दुमडा. नंतर त्याची टोकं बंद करून टाका. असे किमान २० ते २५ बनवा आणि याचे थर बनवा. त्याच्या खाली पुठ्ठा किंवा कागदांचा बनवलेला गोल थर लावा. हे थर चिटकवल्यानंतर त्याचं पेन स्टँड तयार होईल.
पूर्वीच्या काळी पाटयावर वाटण वाटलं जायचं, या पाटयाचं महत्त्व खूप आहे. ज्यांच्याकडे पाटा असेल ते सहसा पाटा टाकून देत नाही. पण एवढया जड पाटयाचा काय उपयोग? आता काय मिक्सर आहेच. पण या पाटयाला शोपीस म्हटलं तरीही काही हरकत नाही. पाटयावर लक्ष्मीची सुंदर मूर्ती किंवा घरातली कुठलीही एखादी अँटिक वस्तू ठेवली तर त्याला चांगला लुक येऊ शकतो. पूर्वी सुपाने पाखडण्याची कामे व्हायची पण आता सुप फक्त गौरीच्या ओवश्यालाच वापरलं जातं. नंतर ते असंच पडून असतं. ते सूप भिंतीवर लावून त्यावर खोटया लाल मिरचीची वेल लावा. म्हणजे अँटिक लूक मिळेल. किंवा त्यावरही जरीच्या साडीच्या पॅच लावा म्हणजे एक छान शोपीस तयार होईल.
घरात कित्येक जुन्या ओढण्यादेखील असतात. त्या ओढण्यांची वेणी घालून ती आरशाच्या बाजूला लावा. त्यावर हेअर क्लिप्स लावून ठेवता येतील. तसंच या वेण्या पडदा गुंडाळून ठेवायलादेखील उपयोगी येतील.