बहुचर्चित ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात आरोपी ठरलेल्या सिनेअभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई – बहुचर्चित ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात आरोपी ठरलेल्या सिनेअभिनेता सलमान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. दोनच दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने त्याला पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालानंतर त्याच दिवशी त्याला अंतरिम जामीनही मंजूर झाला होता.
शुक्रवारी या जामिनाची मुदत संपल्यानंतर सलमानने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. हे अपील मान्य करत त्याला सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सलमानला ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीनही मंजूर झाला आहे. सलमानच्या या अपिलावर येत्या १५ जून रोजी सुनावणी होणार असून जुलै महिन्यात त्याबाबत अंतिम निर्णय देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे सलमानची तुरुंगवारी तूर्त टळली आहे.
वांद्रे येथील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीजवळ पदपथावर झोपलेले बेकरी कामगार सलमानच्या गाडीखाली चिरडले गेले होते. २८ सप्टेंबर २००२ रोजी घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले होते. गेली १२ वर्षे या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू होती. ६ मे रोजी या प्रकरणाचा अंतिम निकाल लागून सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानला पाच वर्ष कारावास व २५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती.
न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध होणे साहजिकच होते. त्याप्रमाणे सलमानच्या वकिलांनी त्याच दिवशी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध न झाल्याने न्यायाधीश अभय ठिपसे यांनी सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. या जामिनाची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सलमानच्या वतीने अपील करण्यात आले. बचाव पक्षाने न्यायालयाचा निर्णय कसा चुकीचा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सलमानवर लावलेले कलम रद्द करण्याची मागणीही बचाव पक्षाने केली.
दरम्यान, दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायाधीश अभय ठिपसे यांनी सलमानला सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. सलमानच्या अपिलावर अंतिम सुनावणी झाली नसल्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात घेणे संयुक्त नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. न्यायालयाला उन्हाळी सुट्टी असल्याने येत्या १५ जून रोजी पुढील सुनावणी घेऊन जुलै महिन्यात त्यावर अंतिम निर्णय देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सलमानला ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना त्याचे पारपत्र (पासपोर्ट) ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच परदेशात जाण्यासाठी सलमानला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने सलमानच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने तो किमान दोन महिने तुरुंगात जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.