साईबाबा संस्थानमधील निकृष्ट तूप खरेदी प्रकरण गाजत असतानाच, आता प्रसादालयातील तांदळामध्ये अळ्या, भुंगे, कीडे आढळून आले.
नाशिक- साईबाबा संस्थानमधील निकृष्ट तूप खरेदी प्रकरण गाजत असतानाच, आता प्रसादालयातील तांदळामध्ये अळ्या, भुंगे, कीडे आढळून आले. हा तांदूळ वापरणे संस्थानने बंद केले असून त्याचे गोदामही सील करण्यात आले आहे.
या प्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचा-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.
साई संस्थानच्या गोदामात १७९३ क्विंटल तर उपभांडारात ८१ क्विंटल निकृष्ट तांदूळ आढळून आला आहे. त्यात कीडे, अळ्या, भुंगे असल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी प्रसादालयाचे वरिष्ठ अधिकारी रामराव शेळके यांना दिली. त्यानंतर हा तांदूळ वापरणे बंद करण्यात आले.
संस्थानच्या वतीने सोना, मसुरी या ब्रँडचा हा तांदूळ नांदेडच्या व्यापा-यांकडून खरेदी करण्यात आला होता. मात्र या तांदळाच्या गोण्यांवर कोणत्याही ब्रँडचे चिन्ह नव्हते. निकृष्ट प्रतिचा हा तांदूळ खरेदी करण्यामागील नेमके गौडबंगाल काय? याची चौकशी केली जात आहे.